Maval: तहसीलदारांनी दिले स्पर्श हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश

Maval: Tehsildar orders inquiry of Sparsh Hospital एक तासात रुग्णाच्या माथी मारले 20 हजारांचे बिल आणि पाच हजारांची औषधे

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्यात सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये पेशंटशी वागणूक व चुकीच्या बिल आकारणीबाबत चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले आहेत. 

तळेगाव दाभाडे येथील नगरसेवक अरुण माने, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस व आरटीआय कार्यकर्ते जमीर नालबंद यांनी यासंदर्भात तहसीलदार बर्गे यांना निवेदन दिले असून त्यात स्पर्श हॉस्पिटलच्या चौकशीची मागणी केली होती.

निवेदनात म्हटले आहे की, सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार होत असलेल्या बिल आकारणी व चुकीच्या वागणुकीबाबत अनुभव नुकताच एका पेशंटला आला, सदर पेशंटने तळेगाव दाभाडे येथील प्राथमीक आरोग्य केंद्राचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. दीपक ढवळे यांना सदर प्रकरणाची माहिती दिली.

सदर प्रकरणात पेशंट फक्त एक तास हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्याकडून 40,000 रुपये (चाळीस हजार रुपये) अनामत रक्कम भरून घेतली व पाच हजार रुपये किंमतीची औषधे देण्यात आली. डिस्चार्ज घेतल्यानंतर न वापरलेली औषधे परत घेतली नाही,  तसेच कोणताही रिपोर्ट आलेला नसताना  एक तासाचे तब्बल 20 हजार रुपये व 5 हजार रुपये किंमतीची औषधे सदर पेशंटच्या माथी मारून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

या बाबत डॉ ढवळे यांनी स्पर्श हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला विचारणा केली असता, त्यांनी चुकीची भाषा वापरून तुम्हाला काय कारवाई करायची आहे ती करा आम्ही कोणाला भीत नाही असे खडसावले. आणि अरेरावीची भाषा वापरली.  स्पर्श हॉस्पिटलमध्ये पेशंटशी वागणूक व चुकीच्या बिल आकारणी बाबत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले.

त्याची गंभीर दखल घेऊन तहसीलदार बर्गे यांनी स्पर्श हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्पर्श हॉस्पिटलकडून सर्व आरोपांचा इन्कार

यासंदर्भात स्पर्श हॉस्पिटलची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल  होळकुंदे यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. डाॅ. होळकुंदे म्हणाले की, दबावतंत्राचा वापर करून स्पर्श हाॅस्पिटलला वेठीस धरण्याचा यांचा प्रयत्न  आहे. स्पर्श हॉस्पिटलमध्ये आम्ही शासन नियमांचे पालन करूनच काम करत आहोत. सदर रूग्णाला चांगली ट्रिटमेंट देत, कोणताही चार्ज न घेता त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही पैशांसाठी कोणाचाही जीव धोक्यात घालत नाही, आम्ही रूग्णांसाठी काम करण्याचे व्रत घेतले आहे ते त्यांना बरे करण्यासाठी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.