Maval: बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला, दुर्घटनेतील दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोघांपैकी दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.

संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघे काल सकाळी साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेले होते. त्यावेळी ते पाण्यात बुडाले. यातील संतोष घारे यांचा मृतदेह काल हाती लागला तर आर्यनचा शोध सुरू होता.

घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर पवना नदीच्या पात्रात आर्यनचा मृतदेह दिसल्याची खबर मंगेश घारे यांनी शिरगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

संतोष हा विवाहित असून  एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृत्यूदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. सायंकाळी उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते. अखेर आज सकाळी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला.

शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.