Maval : आंदर मावळातील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील इंद्रायणी नदीवर उभारलेल्या पुलाचे रेलिंग तुटले असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. रेलिंग नसल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. भरीस भर म्हणजे या तुटलेल्या रेलिंगच्या ठिकाणी लाल कापड बांधण्यात आले आहे.
प्रत्येक पुलाला रेलिंग असणे आवश्यक आहे. रेलिंगमुळे वाहन चालकांना पुलाचा अंदाज येतो. त्यामुळे प्रवास सुरक्षित होतो. रेलिंग तुटल्यास तातडीने दुरुस्त करून तिथे नवीन लोखंडी रेलिंग बसवणे बंधनकारक असते. मात्र आंदर मावळातील इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या अत्यंत रहदारीच्या पुलावरील रेलिंग तुटून अनेक दिवस उलटले आहेत. हे रेलिंग दुरुस्त करण्याऐवजी त्याठिकाणी लाल कापड बांधण्यात आले आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल आंदर मावळातील सुमारे ४५ गावांना जोडतो. हजारो वाहने या रस्त्याने ये-जा करतात. मागील आठवड्यात एका वाहनाच्या धडकेत या पुलावरील रेलिंग तुटले आहे. प्रशासनाने हे तुटलेले रेलिंग तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने रेलिंग चक्क कापडाने बांधून प्रवाशांची सुरक्षा बांधून टाकली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुलावरील आणि आसपासच्या काही अंतरावरील रस्ता खड्डेयुक्त झाला आहे. नदीवरील पूल आणि परिसराला निसर्गाची अनोखी देणगी लाभली आहे. त्यामुळे या पुलाला आणि परिसराला पाहण्यासाठी पर्यटक देखील इथे येत असतात. या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच रस्त्यावर पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.