Maval : राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रतीलिटर 10 रुपये अनुदान द्यावे – चंद्रकांत पाटील 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात मला शेतीतले काही कळत नाही, अरे मग माहिती करून घ्या ना असा टोला त्यांनी लगावला.

एमपीसी​ न्यूज ​- राज्यात आज भाजपकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येतंय..मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ​यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील नायगाव गावातील कात्रज दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे प्रभारी योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे,जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, तालुका युवा मोर्चाअध्यक्ष संदीप काकडे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव जितेंद्र बोत्रे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, योगिता कोकरे, सुमित्रा जाधव, वडगाव शहर अध्यक्ष किरण भिलारे, अभिमन्यू शिंदे, प्रदीप हुलावळे, गणेश गायकवाड, सागर शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की​,​ लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या काळात मोठा फटका बसला. अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. गायीच्या दुधाला 30 रुपये दर मिळाला पाहिजे परंतु सध्या शेतकऱ्यांना लिटरमागे 20 रूपये सुद्धा मिळत नाहीये. सरकारने यासाठी ​प्रतीलिटर दहा रुपये अनुदान द्यायला हवं. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान दिलं होतं

दूध पावडरचा विषय केंद्र सरकारचा असेल तर राज्य सरकारने तसं प्रपोजल बनवून पाठवावे. केंद्र सरकार करेल. परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेलेत असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. त्यांना जर शेतीतील काही कळत नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, बाळासाहेब थोरात हे शेतीतील जाणकार आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन केंद्राकडे पाठवा असे​ ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात मला शेतीतले काही कळत नाही, अरे मग माहिती करून घ्या ना.. रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसेच लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील घाला ​असा टोला त्यांनी लगावला. 

कोरोनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले म्हणतात परंतु राज्यात कोरोना सोडून इतरही कामे प्रलंबित आहेत, तिकडेही लक्ष घाला असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.