Maval : भाजप सरकारला आता हटविण्याची वेळ आली -पार्थ पवार

एमपीसी न्यूज- मागच्या लोकसभेला मोदींची लाट आली होती. त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांनी मोदी काहीतरी करतील या आशेवर मत दिली होती. मात्र, मागील पाच वर्षात पश्चाताप करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली असून आता पुन्हा परिवर्तन घडवून आणण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी कर्जत येथे आयोजित केलेल्या संवादसभेत केले. 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज कर्जतमध्ये विविध ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी कर्जत मधील सर्व नागरिकांनी पार्थ पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कर्जतचे आमदार सुरेशभाऊ लाड, मावळ लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक उमेश पाटील, जि.प.समाज कल्याण सभापती नारायण डामसे, रायगड जिल्हा चिटणीस विलास थोरवे, रायगड जि.प.सभापती नरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोकराव बोपतराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले की, मागील दहा वर्षे शिवसेनेचे खासदार या मावळ लोकसभेचे नेतृत्व करत होते मात्र ज्या झपाट्याने मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करणं गरजेचं होतं तो झाला नाही. कर्जत भागात रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. तो मागील दहा वर्षात खासदार सोडवू शकले नाही. रेडझोन, पवना धरणग्रस्तच्या पुनर्वसनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र दहा वर्षात परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात आता परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला घड्याळाला मतदान करून परिवर्तन घडविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव म्हणाले, “मागच्या पाच वर्षात भाजपा सरकारने केवळ लोकांना वेडे बनविण्याचे काम केले आहे. सर्वात जास्त घोटाळे हे भाजपा सरकारच्या काळात झाले आहेत. राफेल घोटाळा हा त्यातलाच एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे आता परिवर्तन करण्याची गरज आहे. मात्र लोकनेते शरद पवार यांनी देशात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणला आहे. त्यांनी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे महिला ह्या आता संरक्षण खात्यात देखील आल्या आहेत. त्याचप्रमाणे आता पार्थ पवार हे मावळ मतदारसंघात काम करून दाखवणार आहेत. मावळ मतदारसंघात बेरोजगारी हटविण्याचे मोठं काम पार्थ पवार हाती घेणार आहेत. त्यामुळे पवार साहेबांसारखच व्हिजन घेऊन पार्थ पवार मतदारसंघात काम करतील”असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.