Maval : स्वामी विवेकानंद सेवा न्यास संस्थेचे कार्य उल्लेखनीय; संस्थेचा 7 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद सेवा न्यास संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी मांडले. संस्थेचा 7 वा वर्धापन दिन नुकताच माळेगाव आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवर बोलत होते.

या सोहळ्यात गड-किल्ले यांच्या संशोधनासाठी ज्यांचं खूप मोठं काम आहे, असे डाॅ.प्रा. प्रमोद बोराडे यांना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष सदानंद भाऊ पिलाणे यांचे हस्ते ‘युवा कार्य गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जात असतो. वेगवेगळ्या शाळांमध्ये संस्कार वर्गांद्वारे संत विचार, देशातील वीर पुरूषांचा इतिहास आणि संस्कृती, अध्यात्मिक आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु हुशार आणि शिक्षण न घेता येणा-या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेऊन त्यांचे पालकत्व स्विकारून त्यांचे शिक्षण पूर्ण करणे, अशा उद्देशाने ख-या अर्थाने ही संस्था स्थापन केली आहे.

यावेळी मुख्याध्यापक संघ मावळचे अध्यक्ष राजेश गायकवाड आणि शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला भालके, माजी पंचायत समिती सभापती शंकरराव सुपे, भालके, भोर आणि इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्ग, ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती लाभली.

यावेळी हभप गोपीचंद महाराज कचरे यांनी आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना स्वामी विवेकानंद या विषयावर ‘युवक कसा असावा?’ या बद्दल मार्गदर्शन केले.

बोराडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, मला खूप सन्मान मिळाले आहेत. पण, आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत खास बाब आहे. कारण ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी माझा कार्याचा गौरव होणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी व अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. यातूनच मला समाजासाठी अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल.

अध्यक्षीय मनोगतात सदाभाऊ पिलाणे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात हभप गणेशमहाराज जांभळे यांनी संस्थेचा उद्देश व कार्याचा आढावा दिला. सूत्रसंचालन बळीराम शिंदे यांनी केले. स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला भालके तर उपस्थितांचे आभार पत्रकार तात्यासाहेब धांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन स्वामी विवेकानंद सेवा न्यास संस्थेचे संचालक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like