Maval : मारहाणीत तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज – गावात थांबलेल्या तरुणाच्या पाठीमागून जाऊन त्याला दगडाने केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.

किरण बाळू वाघोले असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मोठा भाऊ जनार्दन बाळू वाघोले (वय 38, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी शिरगाव चौकी मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार बावड्या ऊर्फ सुहास रामभाऊ वाघोले (रा. दारुंब्रे, ता. मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ किरण वाघोले हा दारुंब्रे गावातील दत्त मंदिराजवळ उभा होता. त्यावेळी आरोपीने त्याच्या पाठीमागून जाऊन दगडाने डोक्यात मारले. यामध्ये बाळू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत फिर्यादी यांचा भाचा मयूर याने फिर्यादी यांना फोन करून माहिती दिली. फिर्यादी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बाळू यांना खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी बाळू यांच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली असून तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले. भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.