Maval : घरफोडी करून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पत्रकार गणेश विनोदे यांच्या घरी चोरी झाली. त्यांच्या भावाच्या पत्नी घराला कुलूप लावून आठवडे बाजारासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 2 लाख 38 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 25) वडगाव मावळ मधील केशव नगर येथे घडली.

भाग्यश्री सुहास विनोदे (वय 27, रा. केशवनगर, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदे यांचे केशवनगर येथे एकाच इमारतीमध्ये दोन फ्लॅट आहेत. पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये विनोदे कुटुंबीय राहतात. तर दुस-या मजल्यावर असलेला फ्लॅट विनोदे कुटुंबीय आराम करण्यासाठी वापरतात. प्रत्येक गुरुवारी वडगाव मावळचा आठवडे बाजार असतो. विनोदे यांचे सासू सासरे आणि त्यांच्या दोन मुली वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आराम करत होते. त्यावेळी त्यांनी खालच्या फ्लॅटला कुलूप लावून बंद केले आणि आठवडे बाजारात खरेदीसाठी निघून गेल्या.

बाजारातून खरेदी करून आल्यानंतर त्यांना कुलूप लावलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्या मुली खेळत असल्याचे दिसले. त्यांनी आश्चर्याने मुलींकडे चौकशी केली असता ‘घराला कडी होती. ती काढून आम्ही आत आलो’ असे मुलींनी सांगितले. दराचा कोयंडा तुटलेला दिसल्याने त्यांनी घरात बघितले असता बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले साडेपाच तोळ्यांचे गंठण, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज गायब होता.

  • अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा उचकडून घरातून दागिने आणि पैसे चोरल्याबाबत त्यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच ठसे तज्ज्ञांचे पथकाने देखील घटनास्थळी भेट दिली. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.