Maval : शिक्षण अन्‌ कर्तृत्त्वाचा संबंध नसतो; खासदार बारणे समर्थकांचे फेसबुकपोस्टद्वारे विरोधकांना उत्तर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांनी शिक्षणावरुन आरोप करणाऱ्या विरोधकांना फेसबुकवर पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिक्षण आणि कर्तृत्व याचा काहीही संबंध नसतो’ असा मजकूर आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचे छायाचित्र टाकलेली पोस्ट बारणे समर्थकांनी व्हायरल केली आहे. ही पोस्ट शेअर करुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीरंग बारणे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. दहावीपर्यंत शिक्षण झाले असतानाही बारणे यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमठविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत असो की देशाच्या संसदेत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघात विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारणे यांच्या शिक्षणाचा मुद्दा काढून खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. विकासावर बोलण्याऐवजी सातत्याने कमी शिक्षणाचा मुद्दा उकरून काढला जात आहे. त्याला बारणे समर्थकांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकून प्रत्युत्तर दिले आहे.

‘शिक्षण आणि कर्तृत्व याचा काहीही संबंध नसतो’ मावळच्या विकासाला श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अनुभवाची गरज आहे, असा मजकूर या पोस्टवर लिहिला आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कामाने ठसा उमटवलेला अमीर खान, क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, तमिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले दिवंगत एम. करुणानिधी आणि गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची छायाचित्रे या पोस्टमध्ये टाकली आहेत. या सर्वांनी कमी शिक्षण असताना देखील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून बारणे समर्थकांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.