Maval: पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करु – पार्थ पवार

पार्थ पवारांनी सुरु केला आभार दौरा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातून पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. लोकशाहीत जनतेना दिलेले कौल मान्य आहे. आपण कुठे कमी पडलो? कोणत्या चुका झाल्या? त्याचे परीक्षण केले जाईल. त्या चुका दुरुस्त करुन पुन्हा जनतेमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करु, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पार्थ पवार यांनी आज (मंगळवार) पासून आभार दौरा सुरु केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मतदार, पदाधिका-यांच्या भेटीगाठी घेऊन ते आभार मानणार आहेत. प्रभागनिहाय आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन ते आभार मानत आहेत.

  • आज पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. दापोडी, पिंपरी, मोरवाडी, काळभोरनगर प्रभागातील पदाधिका-यांच्या भेटीगाठी घेतल्या. निवडणुकीत केलेल्या प्रचारानिमित्त सर्वांचे आभार मानले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू बनसोडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, पराभवानंतरही पार्थ पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

यावेळी पार्थ पवार म्हणाले, ”लोकशाहीत जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. पराभवामुळे खचून न जाता पुन्हा जनतेत जाऊ. मतदारसंघातील पाच लाख जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जरी मताधिक्य मिळाले नसले. तरी, मतांमध्ये वाढ झाली आहे. आपण कुठे कमी पडलो? काय चुका झाल्या? त्या चुका शोधून काढू, त्या दुरुस्त करु, चुकांचे परीक्षण केले जाईल. चुका सुधारुन पुन्हा जनतेमध्ये जाऊन जनतेचा विश्वास संपादन केला जाईल”.

  • ”विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी तयारीला लागावे. आत्तापासूनच जोमाने तयारी सुरु करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. कोणतीही अडचण येऊ द्या. मला हाक द्या, मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा तुमच्या मदतीसाठी मी येईल”, असेही पार्थ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.