Maval : वेहेरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटणेचा पाणी प्रश्न सोडविणार – आमदार शेळके 

Maval: Vehergaon, Dahiwali, Karla, Shilatane water problem to be solved - MLA Shelke

एमपीसी न्यूज – मावळात वेहेरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटणे या गावातील ग्रामस्थांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या गावांसाठी मंजूर असलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना योजनेच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करून या गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली.

वेहेरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटणे या गावांची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, मात्र या योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. प्रलंबित पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी वेहेरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटणे गावच्या ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन आमदार शेळके यांना दिले.

त्यावेळी या योजनेचे काम तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन पाठपुरावा करण्यात येईल, असे शेळके यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी वाकसई गावचे सरपंच दीपक काशीकर, उपसरपंच गणेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मनोज जगताप, शिलाटणे गावचे सरपंच गुलाब अहिरे, वेहेरगाव सरपंच चंद्रकांत देवकर, सागर हुलावळे, माजी सरपंच बाळासाहेब येवले, किरण येवले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की, या गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला मागील सरकारमध्ये मंजुरी मिळाली आहे. मात्र, अद्याप या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. गावातील पाणी प्रश्न गंभीर असून 12 महिने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

सरकारी मंजुरी मिळून देखील अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही. पाणी प्रश्न गंभीर असून या प्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.