Maval: मावळच्या विजयावरुन भाजपमध्ये ‘सोशल मीडिया वॉर’; निष्ठावान अन्‌ नव्यामंध्ये जुंपली

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर श्रेय घेण्यावरुन भाजपमधील निष्ठावान आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘सोशल मीडिया वॉर’ सुरु झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ला किंगमेकर असल्याचे सांगत श्रेय घेऊ पाहणा-यांना निष्ठावान कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. हा वैयक्तिक नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. हिंमत असेल तर विधानसभेला किंगमेकर समजणा-यांनी अपक्ष निवडून दाखवावे असे आव्हान निष्ठावतांनी दिले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी दारुण पराभव केला. तब्बल सव्वा दोन लाख मताच्या फरकाने बारणे विजयी झाले आहेत. पवारांच्या प्रेमापोटी भाजपमधील अनेक नगरसेवकांनी महायुतीचा मनापासून प्रयत्न केला नव्हता. मात्र, बारणे यांच्या विजयानंतर श्रेयवाद सुरु झाला आहे.

एका नेत्याच्या समर्थकाने पिंपरी-चिंचवडचे किंगमेकर अशी पोस्ट सोशलमिडीयावर व्हायरल केली. त्याला भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मावळच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, चाणक्ष जनता आणि महायुतीचे झोकून देऊन काम करणे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांना जाते. पक्षातच राहून गद्दारी करणा-यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. शांत रहावे यातंच भल आहे, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत:ला किंगमेकर समजू नये, हा वैयक्तिक नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या शाखेतील कार्यकर्त्याने घरावर तुळशीपत्र ठेवून केलेले काम यांचा विजय आहे. हिंमत असेल तर विधानसभेला किंगमेकर समजणा-यांनी अपक्ष निवडून दाखवावे असे आव्हान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.