Maval : बारामतीचा कितीही फाफटपसारा आणल्याने मतपरिवर्तन होणार नाही – गिरीश बापट

मतदारांना प्रलोभन, दहशत दाखविणा-या बाहेरच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा; महायुतीची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात बारामतीसह बाहेरचे लोक आणून विरोधकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा जनतेवर प्रभाव पडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मतदार चोखंदळ आहे. बाहेरचे लोक आणल्याने दहशत निर्माण होत असते. फाफटपसारा उपयोगाचा नसतो. नागरिक बोलत नाहीत. करुन दाखवितात. चार पैसे वाटून निवडून येऊ असे वाटणा-यांचा भ्रमनिरास होईल. एकाच आडनावाचा जनतेला कंटाळा आणि वीट आला आहे, अशी टीका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांच्यावर केली. तसेच मतदारसंघात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पैशांचा वापर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना – भाजप – आरपीआय (ए)- रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (शुक्रवारी)भाजप नगरसेवकांची पिंपरीत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे संपर्कनेते बाळाभाई कदम, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक बाबू नायर, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

शहरातील जनता सूज्ञ आहे. महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभी राहील. कार्यकर्ता निर्भीड झाला आहे. मावळात महायुतीने प्रचाराची मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सभा झाल्या आहेत. दोन दिवस मी पूर्ण लक्ष घातले आहे. कोणत्याही परिस्थितीत मावळाची जागा राखण्यात आम्ही यशस्वी होवू, श्रीरंग बारणे नक्की विजयी होतील, असे विश्वास व्यक्त करत बापट म्हणाले, “पवार हे प्रायव्हेट कंपनीसारखी पार्टी चालवितात. त्यांना एकही सक्षम कार्यकर्ता उमेदवार मिळाला नाही. घरातील उमेदवार दिला असून अजितदादांनी बालहट्ट पुरविला आहे. शिरुरमध्ये उमेदवार आयात करावा लागला. तर, पुण्यात प्रबळ उमेदवार मिळाला नाही. नेतृत्वाचा अभाव तिथे पवारांचा प्रभाव, अशी टीका बापट यांनी केली.

पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष पवारांकडे नेतृत्व होते. सत्ता असताना त्यांनी विकास केला नाही. अण्णासाहेब मगर यांच्याप्रमाणे विचार करुन आम्ही विकास कामे करत आहोत. मेट्रोचे काम सुरु आहे. शेतक-यांशी चर्चा करुन पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावला जाईल. शेतक-यांना गोळ्या झाडून, रस्त्यावर आणून आम्ही प्रश्न सोडविणार नाही. त्यांच्याशी चर्चा करुन, मागण्या पूर्ण करुन जलवाहिनीचा प्रश्न सोडविणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

मताधिक्य देणा-या भाजप नगरसेवकाला बक्षीस

भाजपचे सर्व नगरसेवक प्रामाणिकपणे महायुतीचा प्रचार करत आहेत. महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्यासाठी प्रभागनिहाय काम सुरु आहे. ज्या मतदान केंद्रावर मते कमी पडतील. तेथील नगरसेवकाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. ज्या मतदान केंद्रावर जास्त मताधिक्य मिळेल. त्या नगरसेवकाला बक्षीस देणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.

मतदारांना प्रलोभन, दहशत दाखविणा-या बाहेरच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा; महायुतीची मागणी

मावळ लोकसभा मतदारसंघात बाहेरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मतदारांपर्यंत आर्थिक मदत पोहचविण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा उघड उघड भंग आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन, दहशत दाखविणा-या बाहेरच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना-भाजप महायुतीच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.