Maval – ‘मावळ’च्या विकासाला चालना देणार – श्रीरंग बारणे

महायुतीचे नेते, कार्यकर्ते अन्‌ मतदारराजाचे मानले मनस्वी आभार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना चालना देणार आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनी पुर्नजिवीत करणे, रेड झोन, उद्योगधंद्यांना चालना देणे, मेट्रो प्रकल्पाला गती देणे, नदी सुधार प्रकल्प, गड-किल्यांचे संवर्धन, पर्यटन विकासाला चालना देण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महायुतीचे नेते, कार्यकर्ते अन्‌ मतदारराजाचे यांचे मनस्वी आभार मानले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुस-यांदा विजय मिळविल्यानंतर बारणे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेतली. प्रचारादरम्यान सहकार्य करणा-या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, नगरसेविका रेखा दर्शले, अनिता तुतारे, बशीर सुतार आदी उपस्थित होते.

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला सलग दुस-यांदा देशाच्या संसदेत काम करण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, रायगडचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, गौतम चाबुकस्वार यांच्यासह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापापासून साथ दिली. तसेच जनतेने सलग दुस-यांदा त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, असे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले.

मागील पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. काही प्रश्नांचा मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. त्या प्रश्नांना तडीस नेण्याचा मनापासून प्रयत्न या पाच वर्षात करणार असल्याचे सांगत खासदार बारणे म्हणाले. तसेच मेट्रोच्या कामाला गती देणे, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

  • पवना नदी प्रदूषण मुक्त करणे, रायगडमधील उल्हास नदी प्रदूषण मुक्त करणे, गड-किल्ले, लेण्यांचे संवर्धन करणे, मतदारसंघातील उद्योगधंद्यांना चालना देणे, उरण, पनवेल, कर्जत परिसरात लोकचे फे-या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. याचबरोबर पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. पीएमआरडीएअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मावळातील दुर्गम भागात रस्ते, वीज पोहचविली आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.