Maval : दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते मावळ मतदारसंघाचा विकास काय करणार? – पार्थ पवार 

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार? असा सवाल आज मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केला. मावळ मतदार संघातील नेरे गावात आयोजित करण्यात आलेल्या संवाद सभेत ते बोलत होते. 
यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील, ,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडु,पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल घरत, पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकाप अध्यक्ष काशीनाथ पाटील, नगरसेवक हरीश केणी व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
  • पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले, “प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक मतदार हा मागील पाच वर्षात खासदारांना पाहिलेच नाही असे सांगत आहे. खासदार हे फक्त संसदरत्न पुरस्कार घेण्यासाठी खासदार झाले का, असा प्रश्न कधी कधी मला पडतो. मावळ मतदारसंघात विकास हा शून्य आहे. मग हे खासदार झालेच कशाला ? मावळ मतदारसंघाचा कायापालट करण्याचं माझं उद्दिष्ट आहे.

मतदारसंघात रेल्वेचा, पाण्याचा, प्रकल्पग्रस्तांचा, रस्त्यांचा, विमानतळाचा, रेडझोनचा असे अनेक प्रश्न आहेत. सत्ता असूनही जर हे प्रश्न विद्यमान खासदारांना सोडवता येत नसतील तर आता या निष्क्रिय खासदारांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. मावळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनता आता परिवर्तन करणार असा ठाम विश्वास देखील यावेळी पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.