Maval : ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण; मनसेचा वडगाव नगरपंचायत प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा जॅकवेलमध्ये पडल्याने मृत्यू झाला. नगरपंचायतीचा नाकर्तेपणा आणि कामगारांच्या सुरक्षेबाबतचा उदासीनपणा एका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण, असा सवाल मावळ तालुका मनसेकडून विचारण्यात आला आहे.

मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर म्हणाले, “शंकर गुगळे यांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा वडगाव नगरपंचायत कामगारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कित्येक वर्षे पाणी व आरोग्य खात्यात काम करणारे कर्मचारी पूर्वी वडगाव ग्रामपंचायत व आता नगरपंचायतमध्ये आपली सेवा बजवत आहेत. नियमितपणे सेवा देणाऱ्या या कर्मचा-यांच्या सुरक्षेकडे ग्रामपंचायत व नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीकडून नेहमी कानाडोळा करण्यात आला आहे. कर्मचारी संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. दररोज सफाई, शुद्ध पाणी पुरवठा करत असतात. मात्र, त्यांच्या आरोग्याची, भविष्याची काळजी घेण्यासाठी कोणीच का पुढाकार घेत नाही. ही मोठी शोकांतिका व दुःखाची बाब आहे.

याचे उदाहरण म्हणजे आरोग्य खात्यातील प्रभाकर नथु बरदाडे यांना काही दिवसांपूर्वी झोपेत सर्पदंश झाला होता. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील कुटूंबाने हातउसने, कर्ज घेऊन त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करून त्यांचा जीव वाचवला. गेली कित्येक वर्षे हे कर्मचारी नगरपंचायतीच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या जीविताची हमी आजवर नगरपंचायतीने घेतलेली नाही. त्यांना काम करत असताना कोणत्याही प्रकारची संरक्षणाची व सुरक्षेतेची साधने पुरवली जात नाहीत. काम करत असताना दुखापत झाली, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मेडिक्लेम किंवा ईएसआयची सुविधा नगरपंचायत व ठेकेदाराकडून दिले जात नाही. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य समितीच्या माजी सभापती नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी याबाबत ठराव पारित केला होता. मात्र, त्याची पुढील कारवाई न झाल्याने तो ठराव कागदावरच राहून गेला. आतातरी नगरपंचायतीने खडबडून जागे व्हावे आणि सरसकट सर्व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम, ईएसआय व विमा संरक्षण द्यावे. कामाच्या वेळी सुरक्षिततेची साधने पुरवावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

सायली म्हाळसकर म्हणाल्या, “जर योग्य ती खबरदारी घेऊन शंकर यांना सुरक्षेची सुक्षा बेल्ट, हेल्मेट, लाईफ जॅकेट आदी साधने मिळाली असती, तर त्यांचा जीव नक्की वाचला असता. गुगळे कुटूंबात शंकर हे एकमेव कमवते व्यक्ती होते. त्यांच्या मागे त्यांचे वयस्कर वडिल, आई, दोन मुले व बायको असा परीवार आहे. घरचा कर्ता पुरूष गेल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख कधीही न भरून निघणारे आहे. तरी ही नगरपंचायत व सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या मार्फत गुगळे परिवाराला शक्य तेवढी अर्थिक मदत करण्यात यावी व त्यांच्या पत्नीला नगरपंचायतीमध्ये कामावर घ्यावे. तसेच यापुढे कधीच सुरक्षेअभावी कोणाचा जीव जाऊ नये, याची नगरपंचायतीने दक्षता घ्यावी, असेही म्हाळसकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.