Maval : एक लाख 20 हजार ही ‘मॅजिक फिगर’ कोण ओलांडणार?

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 48 हजार 462 पैकी 2 लाख 47 हजार 961 मतदारांनी त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 71.16 इतकी झाली आहे. मतदानाची आकडेवारी पाहता विजयासाठी 1 लाख 20 हजार ही ‘मॅजिक फिगर’ असल्याचे मानले जात आहे. ही ‘मॅजिक फिगर’ कोण ओलांडणार?, याविषयी तालुक्यात जोरदार उत्सुकता आहे.

मावळात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविलेले सुनील शेळके यांच्यातील लढतीकडे केवळ मावळवासीयांचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील एकूण 1 लाख 80 हजार 201 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 31 हजार 406 जणांनी (72.92 टक्के) तर एकूण 1 लाख 68 हजार 257 महिला मतदारांपैकी 1 लाख 16 हजार 554 जणींनी (69.27 टक्के) मतदान केले. एकूण चार तृतीयपंथीयांपैकी एका व्यक्तीने मतदान केले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत 71.2 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी 0.04 टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मतदानाची टक्केवारी किंचित म्हणजे चार शतांश टक्क्याने कमी झाली असली असली तर एकूण मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे झालेले मतदान हे गेल्या निवडणुकीपेक्षा 39 हजार 866 ने जास्त आहे. मागील निवडणुकीत 2 लाख 8 हजार 549 मतदान झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.