Maval : पुढच्या पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरणार नाही – संतोष भोईर

एमपीसी न्यूज – ‘आपण फक्त मन लावून काम करा, आपले मत हे महायुतीच्या माध्यमातून थेट देशविकासासाठी उपयोगी येणार मत आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरणार नाही’ असा विश्वास कर्जत मतदार संघाचे शिवसेनेचे संघटक संतोष भोईर यांनी व्यक्त केला. कर्जत विधानसभा मतदार संघातील कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

देशाच्या सतराव्या लोकसभेची रणधुमाळी झाली त्या निमित्ताने महायुतीच्या विभागवार बैठका सुरु झाल्या आहेत. 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत विधानसभा मतदार संघातील कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी कर्जत मतदार संघाचे शिवसेनेचे संघटक संतोष भोईर यांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये सांगितले की, आपण फक्त मन लावून काम करा, आपले मत हे महायुतीच्या माध्यमातून थेट देशविकासासाठी उपयोगी येणार मत आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही उरणार नाही हे आज तुमच्या विश्वासावरच येथे सांगतो.

भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गायकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, “गेली अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या देशाचे व राज्याचे हित करायचे सोडून फक्त लूट केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात देशाचे हित करण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला जोमाने काम केल पाहिजे कारण, त्यातच देशाचे व आपले हित आहे” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

रविवार (दि. 31) मार्च रोजी सायंकाळी सात वाजता कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये महायुतीतील शिवसेना, भाजप व आरपीआय या मित्र पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राऊत म्हणाले, “रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व रायगड जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकसंघपणे काम करतोय. त्यामुळे यापूर्वी आपल्यामधील अंतर्गत असलेले समज गैरसमज दूर ठेवा. तसेच ज्या-ज्या ठिकाणी नियोजित बैठका असतील हे कार्यकर्त्यांना बाहेरून जरी समजले तरी, कुणाच्याही आमंत्रणाची वाट न पाहता आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण थेट नियोजित ठिकाण गाठून प्रचार बैठकीत सामील व्हायचे आहे कारण, हे महायुतीसाठी महत्त्वाचे असणार असून आपले कर्तव्य समजून काम करा”

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, तालुकाप्रमुख संभाजी जगताप यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविले.

कळंब जिल्हा परिषद वार्डमधील या बैठकीसाठी कर्जत पंचायत समितीचे सभापती राहुल विशे, कर्जत तालुका संघटक राजेश जाधव, विष्णू झांजे, शिवराम बदे, विलास श्रीखंडे, सचिन म्हसकर, जीवन मोडक, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, भरत हाबले, विनायक पवार, संतोष ऐनकर, रवींद्र ऐनकर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तै मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.