Maval News : कान्हे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

एमपीसीन्यूज : संपूर्ण देशभरात covid-19 लसीकरण मोहिमेस विविध केंद्रांवर प्रारंभ झाला आहे. त्यानुसार आजपासून मावळ तालुक्यात देखील covid 19 लसीकरण केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयातही कोरोना लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.

या केंद्रावर सिरम इन्स्टिट्यूट निर्मित COVI-SHIELD लस प्राप्त झाली आहे. या लसीचा आज पहिला डोस अनिल रडे, तर दुसरा डोस भाग्यश्री परदेशी या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदींनी लसीकरण केंद्राला भेट दिली. तसेच मागर्दर्शन केले.

मावळ तालुक्यातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयातील 3700 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या Co-Win पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी करण्यात आली आहे. दररोज शंभर लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवस आधी लसीकरण केंद्रस्तरावरून मोबाईल संदेशाद्वारे लसीकरणाचे ठिकाण व वेळ कळविण्यात येत आहे. त्यानुसार लाभार्थी केंद्रावर पोहोचतात.

त्यानंतर त्यांचे लसीकरण केले जाते. लसीकरणानंतर तीस मिनिटे लाभार्थ्याला निरिक्षण कक्षात थांबवले जाते. लसीकरणांनंतर कोणताही त्रास झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, मावळ तालुका कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे आदी लसीकरण केंद्रावर कामकाज पाहत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.