Maval : पेट्रोल पंपांवर शेतकरी व दूध उत्पादकांना पेट्रोल-डिझेल द्यावे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात शेतकरी व दूध उत्पादकांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश द्यावेत, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठविले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करूनही रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत होती. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात सर्वसामान्याना पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल न देण्याचा आदेश काढला आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल देण्यात येत आहे.

सर्वसामान्यांचा पेट्रोल-डिझेल पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी व दूध उत्पादकांना मोठ्या अडचणींंचा सामना करावा लागत आहे. त्याच बरोबर भाजीपाला व दूध या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. भाजीपाला, धान्य व दूध या जीवनावश्यक गोष्टी असून त्यांचा व्यापार करणाऱ्यांना पेट्रोल व डिझेल मिळत आहे, मात्र या गोष्टींचे उत्पादन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना मात्र पेट्रोल व डिझेल नाकारले जात आहे, याकडे आमदार शेळके यांनी लक्ष वेधले आहे.

कृषी उत्पादन व दुग्ध उत्पादन चालू ठेवण्यासाठी उत्पादित माल बाजारापर्यंत पोहचविण्यासाठी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे शेतकरी व दूध उत्पादकांना पेट्रोल व डिझेल पुरवठा चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत सर्व पेट्रोलचालकांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.