Pimpri: महापौर, उपमहापौरांची उद्या होणार अधिकृत निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर व उपमहापौरपदासाठी उद्या (शनिवारी)निवडणूक होणार आहे.  सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता  आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुक्रमे विनोद नढे व विनया तापकीर यांनी मंगळवारी (दि.31) अर्ज दाखल केले आहेत. पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे  कामकाज पाहणार आहेत. दरम्यान, निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. सत्ताधा-यांनी  अर्ज माघारी घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसला केली आहे. याशिवाय सत्ताधारी भाजपने पक्षाच्या नगरसेवकांना ‘व्हीप’ देखील बजाविला आहे.

…..अशी होणार निवडणूक प्रक्रिया!

सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी आलेल्या अर्जाची माहिती नगरसचिव उल्हास जगताप हे अध्यक्ष गुंडे यांना देतील. सर्व अर्ज ते अध्यक्षांना सादर करतील. त्यावर ते वैध व अवैध अर्जाची घोषणा करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने माघारीसाठी 15 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक घेतली जाईल. त्यामध्ये उमेदवारांच्या बाजूने प्रत्येक नगरसेवकाला हातवर करून मत द्यावे लागणार आहे.  मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मते जाहीर करून महापौर व उपमहापौरांची निवड घोषित केली जाईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.