Pune : महापौरांची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा’ पे चर्चा

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद आणि परीक्षेसाठी दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – फेसबुक लाईव्हद्वारे थेट पुणेकरांशी संवाद साधण्यात मोठे यश आल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा देत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘परीक्षा पे चर्चा’ केली. महापौरांच्या उपक्रमाला दाद देत विद्यार्थ्यांनीही शुभेच्छा स्वीकारल्या आणि महापौरांना धन्यवाद दिले.

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी येत्या १६ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज आहेत. परीक्षेसाठी मनोबल वाढावे आणि तणाव कमी व्हावा या उद्देशाने महापौर मोहोळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक) मीनाक्षी राऊत, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दिपक माळी, सह. प्रशासकीय अधिकारी मनोरमा आवारे उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या एक लाख विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी आनंदाने आणि आत्मविश्वासपूर्वक परीक्षेस सामोरे जायला हवे, त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यापुढील काळात महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियमित संवाद साधून विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या अडचणी जाणून घेऊन व त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.