Pune news: महापौर, आंबिलओढा कारवाईची जबाबदारी झटकू नका – प्रशांत जगताप 

Mayor don't shrug off the responsibility of Ambilodha's action.- Prashant Jagtap

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर कारवाई करून महानगरपालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात 133 झोपड्यांतील कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारही भाजपचेच आहेत. महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता आहे. तरीही माणुसकीच्या दृष्टीने कोणताही विचार न करता करण्यात आलेली ही कारवाई निषेधार्ह आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. 

विशेष म्हणजे, या कारवाईवरून गदारोळ उडाल्यानंतर पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कारवाईशी महापालिकेचा संबंध नाही, अशी भूमिका घेतली असून, ती निषेधार्ह आहे. महापौरांनी या कारवाईची जबाबदारी झटकू नये, असेही त्यांनी सुनावले आहे.

चांगल्या कामांचे क्रेडिट घेता, तसे चुकलेल्या कामांची जबाबदारी स्वीकारण्याचाही मनाचा मोठेपणा महापौरांनी दाखविण्याची गरज आहे. त्यापासून पळ काढू नाका असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला .

आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. या वेळचा आक्रोश केवळ पुणेकरांनीच नव्हे, तर राज्यातील जनतेने पाहिला आहे. आंबिलओढा येथे गेल्या 60-70 वर्षांत नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे स्थायिक झाली आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांत पावसाने येथे थैमान घातले होते. वादळी पावसामुळे येथील घरांत पाणी शिरले होते. त्या वेळी मोठ्या प्रमाणात हानी झाली. परंतु, या आपत्तीतही महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपची उदासिनता आणि नाकर्तेपणाच पाहायला मिळाला.

अनेक संसार उघड्यावर पडले असताना, त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज होती. परंतु, ती न करता ऐन पावसाळ्यात या झोपड्यांवर कारवाई करून 133 झोपड़्यांतील कुटुंबांना रस्त्यावर आणण्याचे काम भाजपने केले आहे. ही कारवाई चूक होती की बरोबर होती, हे येणारा काळ ठरवेल. तसेच, ही राजकारण करण्याची वेळ नाही, हेही आम्ही जाणतो. परंतु, यामध्ये या विस्थापितांचा, गरीबांचा दोष काय, याचा विचार होण्याची गरज आहे, असे जगताप म्हणाले.

आंबिलओढा भागातील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. हा भाग ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, त्या पर्वती मतदारसंघाचे आमदार माधुरीताई मिसाळ या भाजपच्या आहेत. तसेच, या भागाचे खासदारही गिरीश बापट हे भाजपचेच आहेत. विशेष म्हणजे, बापट यांनी 25 वर्षे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या कसबा मतदारसंघाच्या सीमेवरचा हा भाग आहे. त्यामुळे, त्यांना येथील परिस्थिती निश्चितच ज्ञात आहे, असा शेरा जगताप यांनी मारला.

या झोपडपट्टीवरील कारवाईबाबत महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पोलीस प्रशासन, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक आणि झोपडीधारक यांच्या बैठका झाल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी महापौरांनी या भागाची पाहणी केली आहे. प्रशासनासोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आमदार माधुरीताई मिसाळ यासुद्धा उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांपासून झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा झाल्याचे अनेक माननीयांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळाले. परंतु, या भाजप नेत्यांनी व प्रशासनाने येथील जनतेच्या आणि पुणेकरांच्या डोळ्यांत धूळफेकच केल्याचे या कारवाईवरून दिसून येते, असा आरोप जगताप यांनी केला.

विशेष म्हणजे, या कारवाईमुळे झालेल्या आक्रोशानंतर यामध्ये महापालिकेचा संबंध नसल्याचे महापौर सांगत आहेत. जर, पालिकेचा संबंध नव्हता, तर कारवाईच्या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त व वॉर्ड ऑफिसर काय करत होते? वृत्तवाहिन्यांना मुलाखती का देत होते?  महापौर साहेब, आपण चांगल्या कामांचे जसे क्रेडिट घेतो, तसेच चुकलेल्या कामांची जबाबदारीही घ्यायला हवी, असे जगताप यांनी सुनावले.

पुणेकरांनी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 100 हून अधिक नगरसेवक जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी निवडून दिले नाहीत. साडेचार वर्षांत तुम्ही पुणेकरांसाठी काहीही केले नाही. आता तुमच्या हट्टापायी आणखी पुणेकर रस्त्यावर येणार नाहीत, याची काळजी घ्या. तुम्ही विस्थापितांना वाऱ्यावर सोडणार असलात, तरी आम्ही सोडणार नाही. आम्ही कायम विस्थापितांच्या पाठीशी आहोत, असे प्रशांत जगताप म्हणले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.