Pimpri : महासाधू मोरया गोसावींची शिकवण आचारणात आणावी – महापौर माई ढोरे

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन

एमपीसी न्यूज –  श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला धार्मिकतेचा वारसा मिळाला. मोरया गोसावी मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे भूषण उंचाविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मोरया गोसावींची शिकवण सर्वांनी आचारणात आणावी, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला आज (शनिवार) पासून देऊळमळा पटांगणावर सुरुवात झाली. महापौर  ढोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  7 ते 17  डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. यावेळी देवस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सेवेचा (ओपीडी) शुभारंभ करण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर शेडगे, गजानन चिंचवडे, विठ्ठल भोईर,  संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अॅड. विकास ढगे-पाटील, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, विनोद पवार,  नितीन लांडे, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.व्ही. शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या की, मोरया गोसावी यांच्यामुळे शहराला धार्मिकतेची वाटचाल लाभली. सर्वांना जागरुक करण्याचे काम मोरया गोसावी यांनी केले. त्यांनी दिलेली शिकवण जपली पाहिजे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात. आनंदी होऊन, विचार घेऊन भाविक जातात. देवस्थानला महापालिका सर्वोतोपरी मदत करील.

खासदार बारणे म्हणाले की, मोरया गोसावी देवस्थान शहराचे वैभव आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मोरयाच्या दर्शनासाठी येतात. देवस्थानतर्फे धार्मिक, सांस्कृतिक, समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भाविकाने परिसराचे पावित्र्य राखावे. आपणच आपली कीर्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. देवस्थानला लोकाभिमुख करण्याचे कार्य मंदार महाराज देव यांनी केले आहे.

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, मोरया गोसावींचा एवढा मोठा सोहळा होतो, हे शहरासाठी गौरवास्पद आहे. भाविकांसाठी हे वैभव आहे. सोहळा आणखी लोकाभिमुख करावा.

रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर म्हणाले की, मोरया गोसावी यांच्या भक्तीमुळे हा मोठा उत्सव साजरा होत आहे. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेने अध्यात्माची जोड दिली आहे.

7 ते 17 डिसेंबरच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम!

महोत्सवानिमित्त 7 ते 17 डिसेंबरच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये  भजन, कीर्तन, शास्त्रीय आणि अभंग गायन, सुगम संगीत, प्रवचन, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, सामुदायिक योगासनवर्ग, रक्तदान शिबिर, पुरुषसुक्त मंडलजप आणि हवन,  श्रीसूक्तपठण, दंत आणि चिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.