Pimpri : आमदार जगताप यांच्या ‘रिमोट कंट्रोल’वर महापौर सभागृह चालवितात –  राहुल कलाटे

शिवसेनेचा आवाज दाबला जातोय; मला लाखाच्या पुढे पडलेल्या मतांची आमदारांना 'सल'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे दादागिरीने सभागृह चालवितात. हेतुपुरस्सरपणे मला बोलू देत नाहीत. शिवसेनेचा गटनेता असून देखील बोलण्यापासून रोखले जाते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यानुसारच महापौर मला टार्गेट करतात. महापौर ढोरे आमदार  जगतापांच्या ‘रिमोट कंट्रोल’ने सभागृह चालवितात, असा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला. तसेच विधानसभेला मला सव्वालाख मते पडली. ही मते आमदार जगताप यांना सलत आहेत, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  विषयपत्रिकेवरील करवाढीच्या प्रस्तावर महासभेत चर्चा सुरु होती. परंतु, बोलू दिले नसल्याने राहुल कलाटे यांनी पाण्याचा ग्लास टेबलवरुन खाली फेकून देऊन महापौरांचा निषेध केला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कलाटे म्हणाले, अनुभवी असलेल्या उषा ढोरे महापौर झाल्यापासून महासभेत गोंधळ सुरु आहे. महापौरांची कामकाजाची पहिलीच सभा तहकूब झाली होती. दुसरी सभा देखील गोंधळातच तहकूब झाली होती. मागील काही सभा गोंधळातच पार पडत आहेत. त्यांच्याकडून दादागिरी केली जाते. महापौर ढोरे नव्हे तर आमदार लक्ष्मण जगताप सभागृह चालवितात. त्यांच्या रिमोट कंट्रोलवरच महापौरांकडून सभागृह चालविले जाते. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. करवाढीच्या महत्वाच्या विषयावर महापौर ढोरे यांनी मला बोलू दिले नाही. महापौरांच्या हौदासमोरील रचना देखील बदलले आहे. राजदंडापर्यंत पोहचू नये यासाठी फर्निचर बसवून घेतल्याचा आरोपही त्यांनी  केला.

दरम्यान, महापौर उषा ढोरे यांनी कलाटे यांचे आरोप फेटाळले. त्यांना पूर्वीच्या विषयावर बोलून दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.