Pimpri : महापौर म्हणतात तुमच्याकडून शिकलो…माजी महापौर म्हणतात ‘नाद खुळा करेल’!

'असले वागणे बरे नव्हे', महासभा घेताच कशाला?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिका-यांना महासभेचे गांभीर्य राहिले नाही. पाणीपुरवठा, शाळेच्या महत्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. सत्तेच्या जोरावर कामकाज रेटून नेले जात असून महासभा घेताच कशाला? असा सवाल करत ‘असले वागणे बरे नव्हे’ असा सल्ला माजी महापौर मंगला कदम यांनी सत्ताधा-यांना दिला. त्यावर महापौर राहुल जाधव यांनी ‘तुमच्याकडून शिकलो’ अशी टिप्पणी केली असता आमचे शिकले म्हणता तर ‘नाद खुळा करेल’, असे जोरदार प्रत्युत्तर कदम यांनी महापौरांना दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या महासभेला आज (शनिवारी) मुहुर्त मिळाले. दोन्ही सभा आज आयोजित केल्या होत्या. जुलै महिन्याच्या सभेला महापौर राहुल जाधव गैरहजर होते. त्यामुळे सभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सचिन चिंचवडे होते. सत्ताधा-यांनी पहिली सभा उपसूचनांचा धडाका लावत रेटून नेली. विरोधकांना बोलून दिले नाही. मध्येच महापौर जाधव आले असता सभा कामकाज न संपविता सभेच्या नियमाचे संकेत मोडत उपमहापौर चिंचवडे यांनी सभेचे अध्यक्षस्थान सोडले.

माजी महापौर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, भाजपकडून सभा शाखेचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. महत्वाच्या विषयावर विरोधकांना बोलू दिले जात नाही. कोणत्याही विषयाला उपसूचना दिल्या जात आहेत. कोणतीही चर्चा न करता विषय मंजूर केले जातात. भाजपची सत्ता आहे. तुम्ही कोणतेही विषय मंजूर करु शकता. परंतु, ते सभाशाखेप्रामाणे करा, त्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. मात्र, चर्चा न करताच विषय मंजूर केले जात आहेत. बोलू न देता विषय मंजूर करणार असाल तर महासभा घेताच कशाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सत्तांतर झाल्यानंतर 25 वर्षापूर्वीची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. त्यामुळे तुम्हीही चुकीच्या उपसूचना देऊ नका. आज सत्तेत आहात म्हणून त्याची चौकशी होणार नाही. परंतु, सत्ता कायम नसते. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सत्ता फिरत असते. त्यामुळे जेलमध्ये टाकण्यासाठी सत्तांतर झाल्यानंतर जुनी प्रकरणे सुद्धा काढता येतील, असा इशाराही कदम यांनी सत्ताधा-यांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.