Pimpri News : ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून युवक – युवतींना नोकरी, व्यवसायाची मिळाली संधी – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील युवक, युवतींना शाश्वत उपजिविका मिळावी या उद्देशातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षभरात शेकडो युवक युवतींना नोकरी, व्यवसायाची संधी मिळाली असल्याबाबत महापौर उषा ढोरे यांनी समाधान व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर ढोरे बोलत होत्या. उपमहापौर हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बाल कल्याण विभागाच्या सविता खुळे, उप आयुक्त अजय चारठाणकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर, अॅटलास कॅप्को इंडिया लिमिटेड कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख कबीर गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती सविता खुळे यांनी लाईट हाऊसची माहिती दिली. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवक युवतींसाठी हा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्याबद्दल विभागाचे आभार मानले आणि युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. अॅटलास कॅप्को इंडिया लिमिटेड कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख कबीर गायकवाड यांनी उपस्थित युवक युवतींना नोकरी आणि व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.

महापौर माई ढोरे यांनी हा उपक्रम प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात राबवावा अशा सूचना केल्या आणि या उपक्रमातून शहरातील जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार अथवा व्यवसायाची उत्तम संधी मिळेल असेही त्या म्हणाल्या.

पिंपरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे मार्च 2021 पासून लाईट हाऊस प्रकल्प सुरु आहे. या मध्ये युवक युवतींना फाऊंडेशन कोर्स, समुपदेशन, व्यावसायिक प्रशिक्षण आणि नोकरी मिळविणे याबाबत मार्गदर्शन केले जाते. फाऊंडेशन कोर्समधून 125 तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामध्ये व्यक्तीमत्व विकासावर भर देण्यात येतो. युवकांना त्यांची क्षमता, बुध्दीमत्ता आणि कौशल्य विकसीत करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन करण्यात येते.

या फाऊंडेशन कोर्सनंतर समुपदेशन करण्यात येते. त्यामध्ये युवकांना निवडीचे स्वातंत्र्य आणि दृढ विश्वास यावर समुपदेशन करण्यात येते. बाजारातील उपलब्ध संधी न परिस्थितीचा ताळमेळ यावर मार्गदर्शन करण्यात येते. समुपदेशनानंतर व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. संगणकाचे युग असल्याने डाटा एंट्री, अकौऊंटींग, ऑफिस व्यवस्थापन, फॅशन डिझाईनींग आणि ब्युटीशियन ह्या बाबत प्रशिक्षण देण्यात येते.

या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. बायोडेटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करुन घेणे, मुलाखतीची प्रक्रीया, कोचींग या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले जाते. गरज पडल्यावर युवकास अथवा कुटुंबियांस समूपदेशन केले जाते अथवा व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.