Pune : सुंदरतेसह पुण्याने अधिक सुरक्षित व्हावे-भूषण गोखले

'माझं पुणं सुंदर पुणं' त्रैमासिकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – “पुण्यात राबवलेला विचार देशभर पसरतो. पुण्याला शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, संशोधन, क्रीडा, सामाजिक अशा विविध चळवळींची परंपरा आणि इतिहास आहे. आजही विस्तारणाऱ्या पुण्याने ही संस्कृती जपत येणाऱ्या लाखोंना मोठ्या मनाने आपल्यात सामावून घेतले आहे. इथे ‘पुणेरी टोमणे’ असले तरी दिलदार असलेल्या पुण्याने अनेक स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी देऊन देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे,” असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.

‘माझं पुणं सुंदर पुणं’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांच्या उपस्थितीत मान्यवर व रसिक-श्रोत्यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी त्रैमासिकाचे संपादक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, कार्यकारी संपादक स्वाती महाळंक उपस्थित होते.

भूषण गोखले म्हणाले, “मी पुण्याचाच असलो, तरी समोर चोखंदळ पुणेकर असल्याने दडपण आहे. ‘क्रियेविन वाचाळता व्यर्थ’ या उक्तीला प्रमाण ठेवून पुणेकर प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण, उल्लेखनीय असे योगदान देतात. येथील वातावरण, हवामान चांगले आहे. इथे मुलींना, महिलांना सुरक्षित वाटते. कित्येक काश्मिरी पंडित पुण्यामध्ये स्थायिक झाले आहेत. तसेच पुण्यातून सर्वात जास्त स्वयंसेवी संस्था काश्मीरमध्ये मदतकार्य पाठवतात. पुणे स्वतःची संस्कृती जपत आधुनिक होतेय, याचा अभिमान आहे. दरवर्षी ८० हजार कुटुंब बाहेरून येतात. त्यांना सामावून घेण्याचा मनाचा मोठेपणा पुण्यामध्ये आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याचा शैक्षणिक विचार काश्मीरमध्ये जाणार आहे.”

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ”पुण्याने मलाही सामावून घेतले, आपुलकी दिली. अनेक वर्षांपूर्वी येथे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. माणसांना शहाणे करत स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेतले. पुण्यात स्वातंत्र्यलढ्यासह शैक्षणिक चळवळ उभी राहिली. पेशव्यांचे, फुल्यांचे, कर्व्यांचे, टिळकांचे पुणे असले, तरी कोणाएका नावाभोवती पुण्याची ओळख नाही. इथल्या माणसामाणसाने ती ओळख जपली आहे. काळानुसार शहराच्या संस्कृतीत, आकारात, शैक्षणिक क्षेत्रात बदल झाले. या बदलांच्या ओघात पुण्याचा विविधांगाने अभ्यास होणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक महाविद्यालयाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. येथील विद्यापीठाला मोठी परंपरा आहे, ती परंपरा, इतिहास अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु आहेत. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. चांगल्या गोष्टीचे कौतुक पुण्यात होते. पुण्यातले उपक्रम जगाला समजावेत, यासाठी दिल्ली, बंगलोरसह पुण्याची तीन अतिमहत्त्व असलेल्या शहरात निवड झाली आहे.”

हेमंत महाजन म्हणाले, “प्रत्येकाला पुणं माझं आहे, असे वाटते ही भावना सुखावणारी आहे. विविध क्षेत्रातील अवलिया पुण्यात आहेत. पुण्याने मला अर्धांगिनी दिली. देशाचे ‘थिंकटॅंक’ पुण्यात आहेत. पण त्याची फारशी दखल घेतली जात नाही. प्रत्येक जण आपापल्या जागी गुंतल्याचे दिसते. देशाचे वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता पुण्यात आहे. अनेक लष्करी संशोधन संस्था येथे आहेत. इथल्या संस्था इतिहास, वैशिष्ट्ये जपली जावीत. त्याचा प्रचार व्हावा. पुण्याला मानवनिर्मित आपत्तीपासून वाचवण्यासाठी आपण प्रत्यकाने पुढाकार घ्यावा.”

प्रास्ताविकात योगेश गोगावले म्हणाले, “पुणे शहराला आपल्या गुणवत्तेमुळे ओळखले जाते.  पुण्यात विविध संस्था आणि गुणी लोक आहेत. येथील निरनिरळ्या क्षेत्राची माहिती पुणेकरांना व्हावी. बहुविविधता समजावी, या उद्देशाने त्रैमासिक सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण शहर शब्दबद्ध केले जाणार असून, विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना व्यसपीठ देण्याचा उद्देश आहे.”

स्वाती महाळंक यांनी ‘माझं पुणं, सुंदर पुणं हे त्रैमासिक सुरु करण्यामागील भूमिका सांगितली. गिरीश खत्री यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.