Pimpri: महापालिकेचे कर्मचारी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

MC employees will pay one day's salary to the Chief Minister's Assistance Fund in the month of May

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  कर्मचारी आपले एका दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला देणार आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील कर्मचारी मे महिन्यातील दोन दिवसाचे आणि ‘क’, ‘ड’ श्रेणीतील  कर्मचारी  अशा एकूण सात हजार 600 कर्मचा-यांच्या एक/दोन दिवसाच्या मानधनातून अंदाजे दीड कोटी रुपये जमा होणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारला मोठ्या अर्थसहाय्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य स्तरावर आणि महापालिका स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मदत म्हणून महापालिकेतील ‘अ’, ‘ब’ श्रेणीतील अधिका-यांचे दोन दिवसाचे आणि ‘क’, ‘ड’ श्रेणीतील अधिका-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यास सरकारने कळविले आहे.

त्यानुसार सर्व विभागप्रमुख, आहरण वितरण अधिकारी यांनी त्यांच्या विभागातील आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मे महिन्यातील वेतनातील वेतन कपात करावे. मूळवेतन-ग्रेड वेतन-महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावी.

कपात झालेल्या एक, दोन दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची व्यवस्था लेखा विभागामार्फत करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.

दरम्यान, महापालिकेतील सात हजार 600 कर्मचा-यांचे मानधन कपात होणार आहे. याची अंदाजे रक्कम दीड कोटी रुपये होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.