गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Me Girls Club : शिक्षण सोडण्याच्या वाटेवर असणाऱ्या तरुणींना तरुणींचा आधार

तरुणींच्या क्लबने वेधले गावकऱ्यांचे लक्ष

एमपीसी न्यूज : नवरात्रीच्या (Me Girls Club) निमित्ताने आदिमायेच्या शक्तीचा जागर सगळीकडे सुरू असतानाच प्रत्यक्षात मात्र तिचेच रूपे असणार्‍या जीवंत स्त्रियांच्या, मुलींच्या जीवनात मात्र त्यांच्या शक्तीचे खंडन करणार्‍या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातलाच एक प्रश्न आहे, ग्रामीण भागातील सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि त्याबद्दलच्या अनास्थेचा. अनेक मार्गांवर एकतर एसटी नाही, वेळेची अनिश्चितता असते तसेच शाळा, कॉलेजच्या वेळा आणि एसटीच्या वेळा जुळत नाहीत. त्यामुळे अनेक मुले खास करून मुली शिक्षणाला मुकतात.

शाळा कॉलेजला जाण्यासाठी एसटीची सुविधा नसल्यामुळे मुलींना 5-6 किलोमीटरचा प्रवास पायाने करावा लागतो, त्यांच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे, त्यामुळे होणारा त्रास रस्त्याने जातांना होणारी छेडछाड, अनोळख्या व्यक्तीच्या गाडीवर बसून येण्यामुळे निर्माण होणारा धोका या सर्वांमुळे अनेक मुलींना तर शिक्षण नकोसे वाटते किंवा लांबचा प्रवास असल्यामुळे मुली आणि पालक शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतात.

निर्मलाचा (नाव बदललेलेआहे) चेहेरा हे सांगताना ओशाळला, “ताई पाळीच्या वेळी चालत जातांना मांड्याना जखमा होतात, नकोसे वाटते. त्यात आमचे कॉलेज 12 वाजता भरते आणि गाडीच गावात 12 वाजता येते. यात मुलींचे 1-2 लेक्चर तरी बुडतातच” ही स्थिती काही एकट्या निर्मलाची नाही, अशा अनेक निर्मला काहीही न बोलता शिक्षण सोडून घरी बसण्याचा मार्ग निवडतात. त्यातूनच बालविवाह, बालमजुरी सारख्या समस्या निर्माण होतात. पण, या प्रश्नाकडे समाज, प्रशासन गांभीर्याने बघत नाही.

या आणि मुलींशी संबंधीत अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गावातल्या तरुण मुली एकत्रित आल्या आहेत. मुलींना शिक्षणासाठी गावत एसटी आली पाहिजे, या ध्यासाने त्या प्रेरित झाल्या आहेत. मुलींनी गावात ‘आम्ही चमकते तारे’… ‘मी शक्ती गर्ल्स क्लब’ची स्थापना केली आणि कधीही कोणासमोर न मांडलेला प्रवासाचा मुद्दा त्यांनी पथनाट्याच्या माध्यामातून गावातील सबंधित मान्यवरांच्या समोर मांडला आणि या प्रश्नांबद्दल ठोस भूमिका घेण्याची मागणी केली.

Ambegaon Crime : शाळकरी मुलामध्ये खुन्नस, नववीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

मुलींच्या या ‘मी शक्ती गर्ल्स क्लब’ (Me Girls Club) प्रकल्पाला Schindler India Private Ltd. कंपनीचे सहकार्य आणि Work for Equality या संस्थेचे मार्गदर्शन लाभले आहे.

Girls clubच्या उद्घाटनाला गावातील ग्रामपंचायत सदस्य सुरेश काळे, किसन जाचक, संचालक भिमराव जाचक सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ महाळुंगकर, पोलीस पाटील दिपाली दौंड, अंगणवाडी सेविका प्रमिला दौंड व समस्त गावकरी तसेच संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास, प्रतिनिधी श्रद्धा तेलंगे, गटाचे नेतृत्व करणारे सुरज कांबळे त्याचे सहकारी गणेश सुर्यवंशी तसेच गर्ल्स लीडर वैष्णवी, प्रांजल, प्राजक्ता, ऋतुजा, सपना, अस्मिता, संतोषी, मंजू, पायल या गर्ल्स लीडर उपस्थित होत्या.

Latest news
Related news