Meaning of National Pledge: अर्थ प्रतिज्ञेचा (भाग 1) – भारत माझा देश आहे

एमपीसी न्यूज (प्रा. श्रीपाद भिडे) – पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा छापलेली असते. ती नुसतीच तोंडपाठ असते, नाही का? जरी ही प्रतिज्ञा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाकरिता ही प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा व्हायला हवी आणि म्हणूनच आपण या प्रतिज्ञेचा अर्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरू करीत असलेल्या या विशेष लेखमालेतून समजावून घेणार आहोत.

भारत … भा अर्थात तेजस्विता आणि रत म्हणजे रममाण, कार्यमग्नता! तेजाच्या उपासनेची शिकवण देणारा आपला देश- साक्षात भगवंताच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे भारत. ह्या पावन भूमीतील बऱ्याच महावीरांनी राष्ट्रहितासाठी स्वत:ला बंधनात अडकवून घेतले होते.

आजन्म ब्रह्मचर्याची भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, पितृवचनासाठी चौदा वर्षे वनवास म्हणजेच राज्यत्यागाची श्रीरामांची प्रतिज्ञा, हिंदवी स्वराज्य स्थापनेची शिवरायांची प्रतिज्ञा आणि चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर आपल्या कुलदेवतेसमोर मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्‍त करण्यासाठी शत्रूला मारीता मारीता मरेतो झुंजण्याची सावरकरांची प्रतिज्ञा. अशा अनेक प्रतिज्ञा आपल्याला माहीत आहेत. हे सर्व महात्मे आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहून त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत राहिले म्हणून या प्रतिज्ञा जणू काही “भीष्म-प्रतिज्ञा” ठरल्या.

मित्रांनो, अशीच एक प्रतिज्ञा आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली असते. ती नुसतीच तोंडपाठ असते, नाही का? जरी ही प्रतिज्ञा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाकरिता ही प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा व्हायला हवी आणि म्हणूनच आपण या प्रतिज्ञेचा अर्थ या लेखमालेतून समजावून घेणार आहोत.

‘भारत माझा देश आहे.’

काय मित्रांनो ! आहे का भारत देश माझा, आपला? ज्या स्वतंत्र भारतात आपण अभिमानाने, मान ताठ करून जगत आहोत. त्या आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यरुपी धनाची आपल्याला खरंच जाण आहे का? अगणित घरं, संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत या स्वातंत्र्यासाठी. आयते जेवणाचे ताट समोर आले ना की जेवण गोड लागत नाही, असं म्हणतात. या स्वतंत्र भारताबाबतीतही आपल असंच काहीसं झालं आहे. विनासायास मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत आपण विसरून गेलो आहोत. जो तो आपल्याच मस्तीत मार्गक्रमण करत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेस दोन जन्मठेपेची शिक्षा झालेली होती, त्यावेळेस अंदमानला जाण्याआधी त्यांनी यमुनाबाई अर्थात त्यांच्या पत्नीची समजूत काढली. तेव्हा ते म्हणतात, “माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटे बांधायचे, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची यालाच जर संसार म्हणत असतील तर हा संसार कावळे-चिमण्या पण करतात. आम्हाला देशाचा संसार करावयाचा आहे. उद्या स्वतंत्र्य झालेल्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर बघायचा असेल तर मग आपल्या घराचा धूर नको का करायला?”

मित्रांनो, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस असे अनेक जण उच्चशिक्षित होते. परदेशातून बॅरिस्टर ही अत्युच्य पदवी मिळवलेले तात्याराव उर्फ सावरकर; ठरवले असते तर किती तरी आनंदात जगू शकले असते. इंग्रजांची चाकरी करत कितीतरी पैसे कमवू शकले असते. पण “माझा देश गुलामगिरीत खितपत पडलेला असताना मी सुखासीन आयुष्य जगणे” हा विचारच त्यांना पटणारा नव्हता. कारण शिवराय हे त्यांचे दैवत होते, ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .

सावरकर आपल्या अजरामर अशा “सागरास” या कवितेत म्हणतात,

गुणसुमने मी वेचियली ह्या भावे।
कि तिने सुगंधा घ्यावे।।
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा|
हा व्यर्थ भार विद्येचा।।

आपण मिळवलेल्या ज्ञानाचा जर आपल्या मातृभूमीला उपयोग होत नसेल तर ती विद्या व्यर्थ आहे. पण आजची स्थिती बरोबर विरुद्ध आहे. ज्या आई – बापाच्या जीवावर मुले उच्च शिक्षित होतात, त्या आई – बापाला वृद्धाश्रमाची वाट दाखवून अतिशय आरामातील आयुष्य परदेशात व्यतीत करणारी कित्येक मुले आहेत. आपल्या देशात राहून इतर देशांचे गोडवे गाणारे तर हजारो असतील. इतर देशातील चांगल्या गोष्टी नक्कीच आत्मसात करावयास हव्यात. पण त्याचा आपल्या मातृभूमीसाठीही उपयोग झाला पाहिजे.

हजारो वर्षांची आपली योग साधना जेव्हा परदेशातून “YOGA” म्हणून येते आणि मग ढीगभर पैसे देऊन आपण ती आत्मसात करण्याच्या मागे लागतो. यालाच म्हणतात, “पिकतं तिथं विकत नाही!” सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण बेलाशक अस्वच्छतेस कारणीभूत होतो, पण परदेशात गेल्यावर मात्र स्वच्छतेचे पुजारी म्हणून वावरतो. काय मग भारत आपलाच देश आहे ना?

मित्रांनो , जेव्हा आपण एखादी गोष्ट अतिशय अभिमानाने सांगतो, “ही जमीन माझी आहे”, ” ती बघ 10 लाखांची माझी गाडी”, “अरे, हा बंगला माझाच ”
माझ्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आपण जीवापलीकडे काळजी घेतो मग हीच आस्था “भारत माझा देश आहे” असे म्हणताना जाते कुठे? ज्या वेळी आपण आपल्या देशातील अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे आदर भावाने, प्रेम भावाने “ही गोष्ट माझी आहे” असे म्हणून पाहू तेव्हाच त्या गोष्टीबद्दल मनात आस्था निर्माण होईल. आणि मग भारत माझा नाही तर माझाच देश होईल.

(क्रमशः)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.