Pune News : मेडिकलमध्ये चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद

दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मेडिकल स्टोअर्समध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून उरलेली रोख रक्कम आणि कॅमेरा असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरज उर्फ पप्या रमेश जाधव (वय 21) आणि रोहन सुभाष गायकवाड (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 28 एप्रिल च्या रात्री कोंढवा परिसरातील शितल मेडिकल स्टोअर्स या दुकानात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश करत रोख सव्वा लाख रुपये चोरून नेले होते. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे या गुन्ह्याचा तपास करत होते.

तपासादरम्यान ही चोरी वरील दोन्ही आरोपींनी केली असल्याची गोपनीय माहिती प्रभाकर कापुरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही भवानी पेठेतील कासेवाडी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले रोख 1 लाख 32 हजार 800 रुपये आणि 70 हजार रुपये किमतीचा कॅमेरा असा एकूण 2 लाख 2 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आरोपी सुरज उर्फ पप्या जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खडक पोलीस स्टेशन हद्दीतून त्याला तडीपार करण्यात आलेले आहे.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सध्या लॉकडाउन असल्यामुळे इतर सर्व दुकाने बंद आहेत मात्र मेडिकल चालू आहेत. कोरोना महामारीमुळे मेडिकल दुकानदार व्यवसाय चांगला चालला आहे. त्यामुळेच मेडिकल दुकानात चोरी केल्याचे या दोघांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.