Talegaon : तळेगाव एमआयडीसीत जाणा-या जमिनीचे दर निश्चित करण्याबाबत गुरुवारी बैठक

एमपीसी न्यूज – तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक पाचमध्ये आंबी ग्रामपंचायत आणि अन्य गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत आहेत. अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींचे मूल्यांकन दर निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 23) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ-मुळशी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी याबाबत एक नोटीस जाहीर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह येथे ही बैठक सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक पाचमध्ये मावळ तालुक्यातील आंबी आणि आसपासच्या जमिनीचे भूसंपादन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून करण्यात आले आहे. त्याबाबतची अधिसूचना 26 सप्टेंबर 2006 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार अधिग्रहित जमिनींचे मूल्यांकन दर निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित सर्व खातेदारांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यामध्ये करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.