अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 4)

एमपीसी न्यूज- आज आमच्या ट्रेकचा चौथा दिवस. गेल्या तीन दिवसापासून फक्त चालण्याचा अनुभव घेतला पण आज आमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागणार होता. पायाचे अक्षरशः तुकडे पडणार होते. पण या कष्टाचे चीज होणार होते. कारण निसर्गाचा अद्भुत नजराणा आम्हाला अनुभवायला मिळणार होता. सकाळी पॅकलंच घेऊन आम्ही निघण्यासाठी सज्ज झालो. रोज ती पुरी भाजी आणि फ्राइड राइस खाऊन मला कंटाळा आला होता. म्हणून मी पाच-सहा उकडलेली अंडी घेतली.

आम्ही आज चेरापुंजीपासून 8 किमी अंतरावर असलेल्या नोहकलीकाई (NohKaLikai waterfall) धबधबा पाहून तेथून 3500 हजार फूट दरी उतरून रेनबो धबधबा पाहायला जाणार होतो. स्वच्छ सूर्यप्रकाशात या धबधब्याच्या पाण्यावर इंद्रधनुष्य दिसते म्हणून त्याला रेनबो फॉल असे म्हणतात. त्यानंतर त्याच दरीमधून चालत चालत एका गावात असलेला रूट ब्रिज म्हणजे झाडांच्या मुळापासून तयार झालेला पूल पाहायचा होता.

आम्हाला घेऊन जाण्यासाठी 15 टुरिस्ट टॅक्सी आल्या होत्या. त्यांनी आम्हाला नोहकलीकाई येथे सोडले. यावेळी आमच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. ज्यांना एवढे चालणे शक्य नाही त्यांना हीच टॅक्सी पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे तैराना (Tyrna) गावात सोडणार होती. चार-पाच ट्रेकर्स मंडळी चालण्याचा प्रोग्रॅम रद्द करून टॅक्सीमधून पुढील मुक्कामी निघून गेले. बाकीचे सर्वानी नोहकलीकाई येथील धबधबा पहिला आणि चालायला सुरुवात केली. आमच्यापैकी काहीजण पुढे निघून गेलेले होते.

डोंगर सपाटीवरून थोडे अंतर गेल्यानंतर दरीमध्ये उतरणारी पायवाट दिसली. घनदाट झाडीमधून वाट काढत आम्ही दरी उतरू लागलो. निम्मे अंतर पार केले. थोडावेळ विश्रांती घेत फोटो काढत आमचा प्रवास सुरु होता. या दरीमध्ये रातकिड्याचा एक असा आवाज ऐकू येत होता, जसा कुणीतरी पाणी खेचण्याची मोटार सुरु करावी. पूर्ण दरी उतरेपर्यंत हा आवाज येत होता. दीड तास चालूनही दरीचा तळ काही केल्या दृष्टीस पडत नव्हता. उतरताना गुडघ्यावर जोर येत असल्यामुळे गुडघे दुखायला लागले होते. हातात काठी असल्यामुळे शरीराचा बराचसा भार काठीवर टाकता येत होता. म्हणूनच ट्रेकिंग करताना काठी खूप आवश्यक असते. एवढ्यात दूरवरून पाण्याचा कोसळण्याचा आवाज येऊ लागला. तसा आमच्या जीवात जीव आला. अखेर दोन तास पायपीट केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी पोचलो जिथून एक रस्ता रेनबो धबधब्याकडे तर दुसरा रूट ब्रिजकडे जातो. आम्ही रेनबो धबधब्याच्या दिशेने नदीला समांतर चालू लागलो. हे अंतर सुद्धा दोन किमीचे आहे. आता मात्र चालण्याचा कंटाळा आला. वाटेत भेटणारी माणसे ‘जवळच आहे’ असे सांगत आम्हाला धीर देत होती. खरे तर पुढे जायचा कंटाळा आला होता. पण येणाऱ्या माणसांनी केलेले वर्णन ऐकून पुढे चालू लागलो. पायऱ्या असलेला रस्ता कधी चढून तर कधी उतरून अखेर त्या रेनबो धबधब्यापाशी पोचलो.

त्या ठिकाणी उंचावरून पाण्याचा पांढराशुभ्र प्रपात खालच्या निळ्याशार जलाशयामध्ये कोसळताना पाहून सगळा त्रास, क्षणार्धात नाहीसा झाला. ते दृश्य डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवत खडकांमधून वाट काढत खाली धबधब्याच्या पायथ्याला पोचलो. धबधब्याच्या समोर असलेल्या मोठ्या खडकावर काहीजण बसून पाण्याचे तुषार अंगावर झेलत होती. या खडकावर जाण्यासाठी लोखंडी वायर रोप बांधण्यात आला असून त्याच्याआधारे खडकावर जाता येते. या खडकावरून इंद्रधनुष्याची कमान नजरेस पडत होती.

त्या थंडगार पाण्यात स्नान करण्याचा मोह आवरता आला नाही. बर्फासारख्या पाण्यात अंग ओले करून पुन्हा स्वच्छ सूर्यप्रकाशात ‘सनबाथ’ घेतला. तासभर या दृश्याचा आनंद घेत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पुन्हा तो चढ उताराचा रस्ता पार करून आम्ही दरीमधूनच त्या नैसर्गिक पुलाच्या दिशेने निघालो. वाटेत एक झाडांच्या फांद्यांपासून तयार केलेला एक पूल लागला. तो पार केल्यावर लगेच एका लोखंडी झुलत्या पुलावरून नदी ओलांडून पुढे चालू लागलो. काही वेळाने आम्हाला सुपारीच्या बागा दिसू लागल्या. जणू काही आपण कोकणात आसूदच्या पोफळीच्या बागेमधून जात असल्याचा भास झाला. अगदी टिपिकल कोकण !

थोड्यावेळातच त्या महाकाय पुलाजवळ आलो. झाडांच्या मुळापासून तयार केलेल्या या पुलावर सुपारीच्या झाडाची खोडे अंथरली होती. एका शेजारीच एक असलेले हे दोन पूल. एक उंचीने मोठा तर दुसरा छोटा. गाव म्हणजे कोकणातील वाडीच वाटत होती. या ठिकाणी चहा घेतला आणि पुढे निघालो. गावातील छोटी छोटी मुले घरासमोर खेळत होती. मी माझ्याकडील एक मँगो बाईट एका मुलाला देऊ केली, तर त्या मुलाने आपल्या वडिलांकडे पहिले, ‘मी घेऊ का ?’ असे त्याने नजरेनेच विचारले. त्याच्या वडिलाने डोळ्याने इशारा करताच त्या चिमुकल्याने माझ्या हातातील गोळी घेतली आणि माझ्याकडे पाहून एक मस्तपैकी फ्लाइंग किस टाकला. थोडक्यात सांगायचे म्हणजे महाराष्ट्र असो की मेघालय आई वडिलांचे संस्कार सगळीकडे सारखेच असतात.

गाव मागे टाकून आम्ही वेगात पुढे निघालो. कारण 3500 पायऱ्या चालून आम्हाला ही दरी पार करायची होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. म्हणजे तासाभरात पूर्णपणे अंधार पडणार होता. डोंगर चढणे सोपे असते. पण पायऱ्या चढणे सर्वात त्रासदायक. कारण प्रत्येकवेळी तुम्हाला पाय वर उचलावा लागतो. अशावेळी नेहमी पायऱ्या सरळ न चढता कर्णरेषेत चढल्या की कमी त्रास होतो. ५००-१०००- १५०० पायऱ्या चढेपर्यंत उत्साहात पायऱ्यांची संख्या मोजली जात होती. पण पुढे पुढे कधी एकदा पायऱ्या संपणार याची आम्ही वाट पाहत होतो. किर्रर्र अंधार पडला होता. बॅटरीच्या प्रकाशात निघालो होतो. वाटेत स्थानिक लोकांची घरे लागली. एका ठिकाणी चहा घेतला.

पुन्हा लोखंडी रेलिंगला धरून व्यवस्थितपणे बांधलेल्या पायऱ्यांवरून चाललो होतो. लांबवर दिवे दिसले की वाटायचे दरी संपली. पण पुन्हा बॅटरीच्या उजेडात आकाशाच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या की पोटात गोळा यायचा. आता एक पाऊल सुद्धा पुढे टाकणे जीवावर आले होते. थांबत विश्रांती घेत अखेर ज्यावेळी उंचावर एका चर्चची इमारत दिसली आणि आमचा जीव भांड्यात पडला. भराभर उरलेल्या पंधरावीस पायऱ्या चढल्या आणि आम्ही तैराना गावातील एका चर्च समोर आलो. याच गावात दोन बंगल्यांमध्ये ‘होम स्टे’म्हणून आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या बंगल्यात पोचलो आणि आम्ही विजयोत्सव साजरा केला. अखेर काहीही त्रास न होता. आमच्या शारीरिक क्षमतेची चाचणी झाली. रात्रीचे भोजन उरकून आम्ही झोपी गेलो. आजची रात्र मात्र वाजत गाजत गेली. कारण भयंकर दमणूक झाल्यामुळे प्रत्येकाने ‘घोराख्यान’ सुरु केले. कुणी खर्जात तर कुणी तार सप्तकात जुगलबंदी सुरु केली. धम्माल आली.

(क्रमशः)

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like