PNB bank scam : PNB बँक घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

एमपीसी न्यूज : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी एटिंग्वा-बारबुडा येथून गायब झाला होता. मात्र गायब झाल्याच्या काही दिवसातच त्याला डॉमिनिका या देशातून अटक करण्यात आली आहे. इंटरपोलने त्याच्या अटकेबाबत सीबीआयला कळवलेले आहे. इंटरपोलने चोक्सीसाठी यल्लो नोटीस जारी केली होती.

डॉमिनिका हा कॅरेबियन समुद्रातील एक छोटा देश आहे. अँटीग्वा पोलिसांनी डॉमिनिका पोलिसांकडे चोक्सीची कस्टडी मागितली आहे. ‘आम्ही डॉमिनिकन सरकारला चोक्सीबाबत कळवले होते. त्याला त्यांच्या देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करू देऊ नका असेही सांगितलेले. चोक्सी तिथे पोहचण्यात यशस्वी झाला. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे’, असे अँटिग्वा आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॉन ब्राऊन यांनी सांगितले.

पीएनबी घोटाळ्यानंतर पळून गेलेल्या चोक्सीने एटिंगाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुल चोक्सी देशात लपून बसला होता त्या एटिंग्वा-बारबुडाच्या पंतप्रधानांनी त्याचे नागरिकत्व रद्द करून त्याला हिंदुस्थानच्या हवाली करणार असल्याचे सांगितले होते.

हिरेव्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटींचा गंडा घातला. त्यानंतर दोघेही आपापल्या कुटुंबासह परदेशात पळून गेले. नीरव मोदी याने प्रथम बेल्जियम आणि नंतर इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेला. सध्या त्याच्यावरही लंडनमध्ये खटला सुरू असून त्याच्याही प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.