Pimpri : वाजपेयी यांच्या ‘अटल’ आठवणी

शहरातील भाजपच्या नेत्यांनी दिला उजाळा

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे आज (गुरुवारी) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आठवणींना पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नेत्यांनी उजाळा दिला आहे.  

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी म्हणाले, अटलजींना पुण्याबद्दल नितांत आदर होता. 1995 ते 1999 या कालावधीत मी भाजपचा शहराध्यक्ष होतो. त्यावेळी चिंचवड येथील चापेकर चौकात त्यांची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मी होतो. त्यानंतर त्यांना घेऊन मी खडकीला सभेला गेलो होतो. मी त्यांना खपू जवळून पाहिले आहे. माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले आहे. अटलजी परमेश्वर होते. अटलजी गेल्याचे मला खूप दु:ख झाले आहे. पुण्यातील त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी खूप जवळून त्यांना अनुभवले आहे. दिल्लीला भेटण्यासाठी मी तीनदा गेलो होते. परंतु, सुरक्षारक्षकांनी मला भेटून दिले नव्हते. भेट झाली नसल्यामुळे मला खूप वाईट वाटले. मी खूप रडलो होतो. अटलजी गेल्याने माझे हृदयच बंद पडले आहे. मध्येच ते मला मराठीतून हाक मारत होते, आठवणी सांगताना वाणी यांना अश्रू आनावर झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी म्हणाले, ‘अटलजी यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी जिव्हाळ्याचे नाते होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अटलजी तीनदा पिंपरी-चिंचवडला आले होते. पुण्यात आल्यानंतर पुरणपोळी व सुरळीच्या वड्या या खाल्ल्याशिवाय ते जात नसे. पुण्यातील श्रेयस हॉटेल त्यांच्या आवडीचे. पुण्यात आले की ते तेथेच राहत होते. 1984 ला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे तीन दिवसाचे अधिवेशन पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात झाले होते. त्यावेळी अटलजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अटलजी, लालकृष्ण अडवाणी आणि विजयाराजे सिंदिया या अधिवेशनाला आले होते. या अधिवेशनात मी त्यांना अतिशय जवळून पाहिले होते.

पिंपरी-चिंचवड दौ-याची आठवण सांगताना कुलकर्णी म्हणाले, “अटलजी तीनदा पिंपरी-चिंचवडला आले. तिन्ही वेळा ते लोकसभा निवडणूक प्रचार सभेसाठीच आले. त्यांच्या या तिन्ही सभा जंगी झाल्या. त्यावेळी पिंपरी-चिंचवड हे बारामती लोकसभा मतदारसंघात होते. प्रथम ते 1980 मध्ये शहरात आले. त्यावेळी मोहन धारिया उमेदवार होते. 1984 ला ते आले. तेव्हा संभाजीराव काकडे रिंगणात होते. तर, 1998 ला ते आले तेव्हा विराज काकडे आखाड्यात होते. फर्डे वक्ते असलेले अटलजींच्या या तिन्ही सभा गाजल्या होत्या.”

पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार आठवण सांगताना म्हणाले, सन 1996 साली बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विराज काकडे होते. त्यांच्या सभेला अटलजी आले होते. या सभेत त्यांना अवघ्या पाच मीटर अंतरावरुन पाहण्याचा दुर्मिळ योग मला आला होता. अटलजी यांच्याविषयची आयुष्यातील सर्वांत मोठी ही आठवण होती. आठवण सांगताना पवार भावूक झाले होते.

भाजपच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे म्हणाल्या, ‘पंतप्रधान असताना अटलजी रायगडावर आले होते. त्यांच्या हस्ते शिवरायांच्या नान्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी रायगडावर गेले होते. त्यावेळी त्यांना समोरा-समोर पाहण्याचा योग आला होता. त्यांनी आम्हाला नमस्कार केला होता. तो नमस्कार मी कधीच विसरु शकत नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच पक्षाच्या अनेक कार्यक्रमात त्यांना ऐकण्याचा योग आल्याचेही त्यांनी सांगितले’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.