BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सूर आणि संगीताच्या साथीने उलगडल्या लतादीदींच्या आठवणी

एमपीसी न्यूज – मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे लतादीदींसह आमच्यावर झालेले संस्कार, मंडई आणि पुण्याच्या परिसरामध्ये गेलेले बालपण, लहानपणीच वडिलांचे हरवलेले छत्र, त्यामुळे सर्व भावंडांची लतादीदींवर आलेली जबाबदारी, ती सांभाळताना केलेला गाण्यांचा रियाज, वयाच्या तेराव्या वर्षी मिळालेली पहिली संधी आणि त्या संधीचे कष्टातून केलेले सोने अशा लता मंगेशकर यांच्या विविध आठवणी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी सूर आणि संगीताच्या साथीसह उलगडल्या.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, विभावरी आपटे, मनीषा निश्चल यांनी लतादीदींचा प्रवास ‘लतादीदी आणि मी’ या कार्यक्रमातून उलगडला. यावेळी स्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्राचे अध्यक्ष जैनमेजे राजेभोसले, सौमित्र गुपचूप, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ या गीताने झाली. गायिका विभावरी आपटे यांनी गाण्याचे सादरीकरण केले त्यांना हृदयनाथ मंगेशकर यांनी साथ दिली. त्यानंतर ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या गाण्याचे सादरीकरण झाले. यावेळी डॉ. राजेंद्र धुरकर व कौशल गणरतवार (तबला), ऋतुराज भोरे (रिदम), निलेश देशपांडे (बासरी), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), यश भंडारे (कीबोर्ड) यांनी साथसांगत केली. विवेक परांजपे यांनी संगीत संयोजन केले. निवेदन वैशाली गोस्वामी यांनी केले.

‘लग जा गले फिर ऐसी रात हो न हो’, ‘रहे ना रहे हम’, ‘यारा सिली सिली’, ‘आजा रे परदेशी’, ‘होटो मै ऐसी बात’, ‘आजीब दास्ता है’, ‘ओ भूली दास्ता’, ‘एक प्यार का नगमा है’ या आणि अशा बहारदार हिंदी मराठी गीतांनी कार्यक्रम अधिकाधिक रंगत गेला.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “वडिलांचे प्रत्येक गुण घेऊन लताताई जन्माला आली आहे. वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा लतादिदींनी गाण्यासाठी वन्स मोर घेतला, त्यानंतर परत गाण्यासाठी प्रेक्षकांनी विनंती केली, त्यावेळी तीन वेळा ते गाणं म्हणले. परत प्रेक्षकांनी दुसरं गाणं गाण्यासाठी जेव्हा विनंती केली तेव्हा लतादीदींनी तेथुन पळ काढला आणि थेट पुणे गाठलं आणि आईला झालेला प्रकार सांगत म्हणल्या साक्षात वडिलांचा आवाज मला मिळाला आहे यावरून तिचे वडीलांबद्दलचे प्रेम आस्था दिसून येते.”

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like