Nigdi News : मुक्त पत्रकाराने जपल्या आपल्या वडिलांच्या स्मृती

सृजन प्रतिष्ठानचा समाजदूत पुरस्कार वितरण  सोहळा

एमपीसी न्यूज : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सृजन प्रतिष्ठानच्या वतीने स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणाऱ्या मान्यवरांना ‘समाजदूत’  पुरस्कार देऊन अप्पूघर जवळील श्रीविहार, सिद्धिविनायकनगरी निगडी येथे गौरविण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी आपली आई सुधा दिगंबर कुलकर्णी यांना बरोबर घेऊन या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एम पी सी न्यूजचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, शब्दधन काव्यमंच, दिलासा संस्था आणि पिंपरी चिंचवड शहर साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश कंक, सामाजिक भान ठेवून कार्यरत डॉक्टर अभय दिवाण, डॉ सुवर्णा दिवाण यांचा सहृदय सन्मान  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि प्रतिभा कॉलेज चिंचवड येथील माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुणे प्रा तुकाराम पाटील होते. याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले, नंदकुमार मुरडे, राजेंद्र घावटे,सविता इंगळे, आय के शेख,निशिकांत गुमास्ते, शरद शेजवळ,राजेंद्र वाघ, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी,आनंद मुळूक,श्रीराम कुंटे, नवीन बोराडे, राजू जाधव उपस्थित होते.

यावेळी डॉ राजेंद्र कांकरिया म्हणाले-  पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत अनेक साहित्यिक, पत्रकार आणि एकनिष्ठतेने काम करणाऱ्या समाजसेवकांचे मोलाचे योगदान आहे. विज्ञानदृष्टी ठेऊन कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान इथे होत आहे ही गोष्ट सामाजिक व्यवस्थेसाठी  स्फूर्तिदायक आहे.

सृजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी संस्थेच्या पहिल्याच कार्यक्रमातून समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्तम कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करून या सर्व पुरस्कारार्थीना  सातत्यपूर्ण काम करण्याचे बळ दिले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. तुकाराम पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले.

पुरस्काराला उत्तर देताना एम पी सी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, डॉ. अभय दिवाण, डॉ सुवर्णा दिवाण भावनावश झाले. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी स्व.दिगंबर कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उगवती नवी पिढी घडविण्यासाठी यापुढे कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी कुलकर्णी, प्रकाश भल्ला, पार्थ कुलकर्णी, ध्रुव कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.  प्रास्ताविक कवी, मुक्त पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी केले.  हृदयस्पर्शी सूत्रसंचलन कवी राज अहेरराव यांनी केले तर आभार राजेंद्र कोरे यांनी मानले. यावेळी शहरातील सर्व साहित्यिकांच्या वतीने सुधा दिगंबर कुलकर्णी या मातेचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.