Menstrual Hygiene Day: सर्वांनीच जाणून घ्या… किशोरवयीन विद्यार्थिनींना शाळेत नेमकं काय हवंय?

Menstrual Hygiene Day: Everyone should know ... What exactly do teenage girls want in school? Article by Prabha Vilas 28 मे, मासिक पाळीच्या स्वच्छतेचा "जागर " - मी शक्ती - Girls Power नेटवर्क

एमपीसी न्यूज – आज 28 मे, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस हा संपूर्ण जगभरात महिलांच्या मासिक पाळी आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी पाळला जातो.  मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब ठेवणाऱ्या वेगवेगळ्या मुद्यांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता हा एक महत्वाचा मुद्दा! ‘वर्क फॉर इक्वॅलिटी’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने काही संस्था संघटनांना एकत्रित करून शाळा व मुलींना मिळणाऱ्या मासिक पाळीच्या सुविधा यावर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांवर आधारित प्रभा विलास यांचा हा विशेष लेख…

28 मे मासिक पाळी स्वच्छता दिवस हा संपूर्ण जगभरात महिलांच्या मासिक पाळी आरोग्याच्या निमित्ताने पाळला जातो.  हा विषय जसा दुलर्क्षित आहे, तसाच आणि त्याच्याशी जोडलेल्या जीवघेण्या श्रद्धा-अंधश्रद्धा, स्त्रियांचे समाजातील स्थान असा देखील आहे.

सर्व शिक्षा अभियान,  समग्र शिक्षण अभियान, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय अभियान, स्वच्छ भारत अभियान या सर्वांचाच अंतिम उद्देश मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे हा असल्यामुळे या प्रत्येक अभियानाच्या निमित्ताने मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब ठेवणाऱ्या वेगवेगळ्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले गेले. त्यातलाच मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता हा एक महत्वाचा मुद्दा…

अनेक विश्वसनीय संस्थांच्या अभ्यासानुसार मुलींना शिक्षणाच्या प्रवाहातून  बाहेर  ढकलणाऱ्या अनेक घटकांपैकी शाळेत मासिक पाळी विषयी मिळणाऱ्या या सुविधांविषयी असलेली उदासीनता हे एक महत्वाचे कारण आहे.

म्हणूनच वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने काही संस्था संघटनांना एकत्रित करून  प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खाजगी सरकारी अनुदानीत अशा 15 माध्यमिक शाळांची मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता यांची काय स्थिती आहे हे समजून घेण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये 1049 विद्यार्थिनींसोबत एक अभ्यास केला गेला.

सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण  होऊ शकतो, अशा  अत्यंत गंभीर बाबी पुढे आल्या. जसे की….

1) 90 % शाळांमध्ये पिण्याच्या  व  वापरण्याच्या  पाण्याची  टंचाई आहे.

2) 99 % शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबणाची किंवा हँडवॉशची सोय नाही.

3) एकाही शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शौचालय नाहीत. आहेत त्यापैकी 50 % नादुरुस्त आहे तर त्यातील काही शौचालये बंद करून ठेवली जातात. विद्यार्थ्यांना वापरू दिले जात नाही.

4) शाळांमध्ये शौचालय स्वच्छतेसाठी नियमित व्यक्ती नाही. बहुतांशी शौचालय स्वच्छ करण्यासाठी बाहेरून 8 ते 15 दिवसांनी व्यक्ती  बोलवली जाते. तसेच शाळेच्या वर्गखोल्या अत्यंत घाण आणि धुळीने माखलेल्या असतात.

5) फक्त 5 % मुलींना शाळेतून सॅनेटरी पॅड मिळतात, मुलींनी दिलेल्या माहितीनुसार सॅनेटरी पॅडचा दर्जा अत्यंत खराब आहे.

6) सॅनेटरी पॅड बदलण्यासाठी जागा नसल्यामुळे व पॅड मिळत नसल्यामुळे 74 % मुली शाळेच्या वेळात एकदाही पॅड बदलत नाहीत.

7) 78 % मुलींनी शाळांमध्ये सॅनेटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनेटरी पॅड डिसपोजल मशीन पाहिजे अशी मागणी केली.

8) 95 % शाळांमध्ये पाळी आल्यावर सोय नसल्यामुळे मुलींना शाळेतून घरी जावे लागते. त्यामुळे अनेक मुलींनी असे सांगितले की, त्यांना पाळीच्या वेळेत शाळेत यायला आवडत नाही व त्या शाळा बुडवतात इत्यादी.

9) बहुतांश मुख्याधापक हे पुरुष असल्यामुळे त्यांच्यासोबत पाळीविषयी सुविधा या विषयावर बोलण्यास मुली व शिक्षिका यांना लाज वाटते व आहे त्या परिस्थितीत मुली व स्त्री शिक्षिका त्रास काढत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत किमान 200 विद्यार्थी आहेत. शाळेत 3 शौचालये आहेत. त्यातील एक खूप घाण आहे व अनेक महिने त्याला कोणी स्वच्छ  केले नाही. दुपारच्या सुट्टीत फक्त अर्धा तास या 2 शौचालयांचे कुलूप काढले जाते व त्यात अर्धा तासात 200 विद्यार्थिनीनी शौचालयांचा  वापर करायला सांगितले जाते. मुलींची खूप फजिती होते.

मधल्या सुट्टीनंतर कोणाला शौचालयात जायचे असल्यास शिक्षक उघड्यावर जा, असे सांगतात. कधी कधी मोठया मुली सुद्धा कपडे ओले करतात. एवढेच नाही तर शौचालयात पॅड टाकण्यासाठी डस्टबिन नसल्यामुळे व आहे ते पूर्ण भरलेले असल्यामुळे मुली शाळेच्या आजूबाजूला कुठेतरी पॅड फेकतात आणि मग ते पॅड सर्व मुलींना हाताने उचलावे लागते. त्यात लहान मुली ज्यांना पाळी येत नाही, त्यांचा देखील समावेश असतो.

हाताने पॅड उचलायला खूप घाण वाटते, असे त्या मुलीने अत्यंत रडवेल्या चेहेऱ्याने सांगितले. पॅड बदलायचे असल्यास बदललेले पॅड दप्तरात ठेवा आणि घरी घेऊन जा, असे शिक्षिका सांगतात.

हा अभ्यास प्रातिनिधिक स्वरूपात जरी एका तालुक्यात केला गेला असला तरी संपूर्ण राज्यातील शाळांची स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे हे आपण सर्वजण जाणतो. ही स्थिती कोरोनाचे संकट वाढविण्यासाठी अनुकूल आहे, हे स्पष्टच आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष विद्यार्थिनींसमोर मांडले असता, या प्रश्नावर मात करण्यासाठी व शाळांमध्ये आवश्यक सोयी सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थिनींनी एकत्रित बसून एक मागण्यांचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा मुलींचे एक जिल्हास्तरीय अधिवेशन घेऊन त्यामध्ये मुलीने हा मसुदा खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, विस्तार अधिकारी कोकणे सर यांना दिला आहे.

किशोरवयीन मुलींच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात मुलींच्या मागण्यांचा मसुदा प्रकाशित करण्यात आला.

सोबतच  विद्यार्थिनींनी या विषयाला वाचा फुटावी म्हणून प्रत्येक शाळेतील मुख्यध्यापकांसोबत मीटिंग घेऊन आपल्या अडचणी त्यांना सांगितल्या आहेत, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओवर विदार्थीनीनी मासिक पाळी या विषावर आधारीत अंधश्रद्धा, भेदभाव, अडचणी, बदलाची गरज या विषयांवर कार्यक्रम करून समाजामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे व मासिक पाळी नैसर्गिक आहे, हे मान्य करून त्या विषयी समाजात सहजता आली पाहिजे, याविषयी आम्ही ‘मी शक्ती – Girls Power’  या नावाने काम करीत आहोत.

कोरोनाचे संकट पाहता पुढील काही काळात शाळा सुरु झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढविण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा नसणे हे एक मोठे कारण होऊ शकते. म्हणून या शाळांमधील विद्यार्थिनींनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्यांचा मसुदा दिला आहे.

त्यात त्यांची प्रमुख मागणी आहे की, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शौचालय, पाणी, हँडवॉश, सॅनेटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन व स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य समितीचे गठन करण्यासाठी राज्यातील खाजगी व सरकारी अशा सर्व शाळांसाठी लेखी आदेश काढावा ही आहे.

आज जागतिक मासिकपाळी दिनानिमित्त सर्व शाळेतील मुलींनी शिक्षण अधिकाऱ्यांना पुन्हा शेकडो पत्रांच्या माध्यमातून पुन्हा या विषयाकडे गंभीरतेने लवकरात लवकर पाहावे, अशी विनंती केली आहे.

शाळांमध्ये मासिकपाळी व्यवस्थापन व स्वच्छता या विषयावर लक्ष देणे आत्ता  केवळ कोरोनाच्या संकटावरच मात करण्यासाठी महत्वाचे नसून शाश्वत  विकासाचे ध्येय ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, लिंगसमभाव यांच्यापर्यंत देखील पोहचण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरू शकेल.

मासिकपाळी आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज आपणास सर्व पालकांना हे जागृतीने पाहावयाची गरज आहे की, आपण आपल्या पाल्याला ज्या शाळेत घालत आहोत, तिथे वर्गखोल्या, कॉम्पुटर, ग्रंथालय, ई-लर्निंग असणे महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे त्या शाळेत पाणी, शौचालय , हँडवॉश, सॅनेटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन व स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य समिती!

यामुळे तुमच्या पाल्याच्या कोरोना विरोधात लढण्यासाठी शाळेत मदत करेल आणि या सोईसुविधा शाळांमध्ये नसतील तर त्या मिळविण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित येऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला पाहिजे, मग शाळा खाजगी असो किंवा सरकारी. तुम्ही या लढाईत सामील होऊ शकता.

प्रभा विलास

(लेखिका या वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या संस्थापिका तसेच मी शक्ती – Girls Power नेटवर्कच्या समन्वयक आहेत.)

संपर्क – मोबाईल 95457 34545 ई-मेल – [email protected] 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.