Pimpri News : डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘मॅसिकॉन’ राज्यस्तरीय परिषद

एमपीसी न्यूज – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र व पूना सर्जिकल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 एप्रिल 2022 रोजी “मॅसिकॉन 2022” शल्य चिकित्सकांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया संदर्भात शल्य चिकित्सकांच्या ज्ञानाचे आदान प्रदान, पुनरावलोकन आणि नावीन्यपूर्ण शस्त्रक्रियांचे अध्ययन हा या तीन दिवसीय परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या परिषदेसाठी 800 हून अधिक शल्य चिकित्सक महाराष्ट्राबरोबर देशभरातून प्रत्यक्षरित्या सहभागी होणार आहेत.

28 एप्रिल 2022 रोजी संध्या 5 वा, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात आयोजित उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, प्र- कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे एस भवाळकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ शहाजी चव्हाण तसेच पूना सर्जिकल सोसायटीच्या कार्यकरणीसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.

28 एप्रिल रोजी परिषदेच्या पहिल्या दिवशी 45 शस्त्रक्रिया प्रख्यात सर्जनद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक, लॅपरोस्कोपिक, ओपन शस्त्रक्रियांचा समावेश आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रियागृहातून याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

29 व 30 एप्रिल रोजी शैक्षणिक विषयानुसार तज्ञांची व्याख्याने, सादरीकरण,मार्गदर्शन, परिसंवाद आदी होत आहे. या परिषदेसाठी रुग्णालयातील अद्ययावत सेवा सुविधासह, तंत्रज्ञ, रुग्णालयातील व्यवस्थापन, संसाधने आणि विशेष करून सर्व शस्त्रक्रिया विभागातील शल्य चिकित्सकांची टीम सज्ज असेल. याकरिता डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. यशराज पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.