Bhosari : सायक्लोथॉनच्या माध्यमातून 7 हजार सायकलपटूंनी दिला नदी स्वच्छतेचा संदेश

एमपीसी न्यूज – अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत आयोजित रिव्हर सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत 7 हजार सायकलपटूंनी रविवारी (दि. 1) नदी स्वच्छतेचा संदेश दिला. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण व नदी स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

रिव्हर सायक्लोथॉनचे उदघाटन सकाळी सहा वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील मैदानावर महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, उद्योजक कार्तिक लांडगे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, कार्याध्यक्ष अशोक माने, सचिव दळवी, नगरसेवक सागर गवळी, दिनेश यादव, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. नीलेश लोंढे, विश्राम कुलकर्णी, सायकल मित्रचे बाप्पू शिंदे, डॉ. आनंद पिसे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

भोसरी गावजत्रा मैदानपासून सुरू होऊन पुणे नाशिक महामार्गावरून जय गणेश साम्राज्य चौकातून परत गावजत्रा मैदानापर्यंत, असा पाच किलोमीटर रॅलीचा मार्ग होता. 10 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदान ते नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे वळून स्पाईन रोडने क्रांती चौकातून परत गावजत्रा मैदानपर्यंत आणि 20 किलोमीटर रॅलीचा मार्ग भोसरी गावजत्रा मैदानपासून नाशिक महामार्गावरून जयगणेश साम्राज्य चौकातून डावीकडे क्रांती चौक, साने चौक, कृष्णानगर चौकातून परत त्याच मार्गाने भोसरीतील गावजत्रा मैदानावर सायक्लोथॉनची सांगता झाली. सायक्लोथॉनमध्ये तरुणाईचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

पर्यावरण व नदी स्वच्छतेविषयी जनजागृती विषय घराघरात पोहचण्यासाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये 55 शाळांमधील 55 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायक्लोथॉन यशस्वी करण्यासाठी अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, दुर्गमित्र, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस नागरिक मित्र अशा 50 सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मोलाची जबाबदारी उचलून ही स्पर्धा यशस्वी केली. पुढील वर्षी 2020 मध्ये ही स्पर्धा अधिक यशस्वी करण्यासाठी 100 शाळा, 10 हजार चित्रकला स्पर्धक विद्यार्थी, 10 हजार सायकलपटू व 100 सामाजिक संस्था यांचा सहभाग हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.