Pune News :  मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप गणेश मंडळ प्रतिनिधींनी घेतला होता. यावर महापौर मोहोळ यांनी सदरील काम तातडीने बंद करण्याचे निर्देश देत मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते.

त्यानुसार महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते आबा बागुल, मेट्रोचे अतुल गाडगीळ, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या विषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार आहे. त्या भागातील मेट्रो कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे.’

‘पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला उपस्थित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.