Mezo Sms Manager App : मेसेजचे स्मार्ट वर्गीकरण करणारे भारतीय बनावटीचे ‘मेझो’ अ‍ॅप विकसित

पुण्याच्या सागर बेदमुथा यांची कामगिरी Mezo Sms Manager App: Developed an Indian-made ‘Mezo’ app for smart classification of messages; Achievement of Sagar Bedmutha of Pune

एमपीसी न्यूज – मोबाईलमधील मेसेज सुरक्षित, स्मार्ट व स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘मेझो’ (Mezo) हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. पुण्याचे सागर बेदमुथा यांनी हे मोफत अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. मोबाईलमधील मेसेजेसचे वर्गीकरण करण्यास व गरजेप्रमाणे बॅकअप घेण्यास हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.

आपल्याला रोज अनेक एसएमएस येत असतात. मोबाईल कंपन्या, बँक, वेगवेगळ्या ऑफर्स, वीजबिले, मोबाईल बिले, रिमाईंडर्स या सर्वांचाच यामध्ये समावेश असतो. एखाद्या वेळी आपल्याला ठराविक मेसेज हवा असतो, मात्र तो नेमका कामाच्या वेळी आपल्याला मिळत नाही. हव्या त्या वेळेला असे मेसेजेस न मिळाल्याने आपण वैतागतो. हा त्रास टाळण्यासाठी पुण्याचे अभियंता सागर बेदमुथा यांनी सर्व मेसेज सुरक्षित, स्मार्ट व स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे मेझो हे अ‍ॅप विकसित केले आहे. ‘मेझो’ अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉईड प्ले स्टोअरवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

सागर बेदमुथा यांनी या अ‍ॅपबद्दल माहिती दिली. बेदमुथा म्हणाले, मेझो हे अ‍ॅप केवळ एक मेसेज अ‍ॅप नसून एआय आणि एमएल या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असे अ‍ॅप आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर वापरकर्त्याला येणारे सर्व एसएमएस यामध्ये सुरक्षितरित्या फिल्टर होतात. हे संदेश केवळ फिल्टरच होत नाहीत तर येणारी प्रत्येक माहिती ही वेगळी करून तिचे वर्गीकरण केले जाते. अशा प्रकारे बँकेकडून आलेले सर्व मेसेजेस, स्टेटमेंट्स, रिमाईंडर्स हे तारखेप्रमाणे व सुटसुटीतरित्या वापरकर्त्याला पाहायला मिळतात.

मेझो अ‍ॅप वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारे मोबाईल क्रमांक, ई-मेल याची विचारणा केली जात नाही. सदर अ‍ॅप हे खाजगीरीत्या ऑफलाईन प्रक्रियेद्वारे मेसेजच्या वर्गीकरणाचे काम करते. यामुळे कोणत्याही काळजीशिवाय ग्राहक हे अ‍ॅप वापरू शकतो. या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्याला खाजगी, व्यावसायिक, बँक स्टेटमेंट आणि रिमाईंडर्स या प्रकारात आपले सर्व मेसेज वाचता येऊ शकतात. मेसेज वाचताना देखील कंपनीचा लोगो, बँक खात्याची नावे, गुगल ड्राईव्हवर बॅकअप, वापरण्यास सोपी आणि सुटसुटीत अशी थीम आदी बाबींचा भारतीय वापरकर्त्याच्या दृष्टीने पूर्ण विचार करण्यात आला असल्याचे बेदमुथा म्हणाले.

कोणी वापरावे मेजो?

सागर बेदमुथा म्हणाले, हे अप्लिकेशन सर्वांसाठी उपयुक्त असून वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे. प्रामुख्याने व्यवसायिक, नोकरदार, विधार्थी यांच्यासाठी हे अप्लिकेशन उपयुक्त असल्याचे बेदमुथा म्हणाले.

कोण आहेत सागर बेदमुथा?

सागर बेदमुथा हे मेकॅनिकल इंजिनिअर असून ऑप्टिनो मोबिटेक या स्टार्ट अप संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बेदमुथा हे सिटी बँक व एचएसबीसी येथे मार्केटिंग विभागात देखील ते कार्यरत होते. त्यानंतर 2009 साली त्यांनी स्वत: ऑप्टिनो मोबिटेक या स्टार्टअप संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या वतीने 2011 साली ‘की मेसेजेस’ हे अँटी स्पॅम मेसेज फिल्टरिंग अ‍ॅप तर 2016 साली प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘स्मार्ट ब्रो’ ही अ‍ॅप्स विकसित करण्यात आली होती. सागर बेदमुथा यांना त्यांच्या अ‍ॅप्ससाठी अमेरिकेतील एमआयटी संस्थेचा टेक्नॉलॉजी रिव्हयूव्ह इनोव्हेशन पुरस्कार याबरोबर नॅसकॉम, नोकिया यांच्या वतीने पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.