IPL 2022 MI Vs CSK : मुंबई इंडियन्सचे वरातीमागून घोडे,चेन्नई संघाला पाच गडी आणि 31 चेंडू राखून दिली दणदणीत मात

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) – प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई इंडियन्स आणि तशीच काहीशी परिस्थिती असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात टाटा आयपीएल 2022 चा आजचा 59 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला गेला, ज्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर 31 चेंडू आणि 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

मुंबईचा कर्णधार रोहीतने आज नाणेफेक जिंकून गोलंदाज धार्जिण्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चेन्नई संघाला फक्त 97 धावात गुंडाळून हा निर्णय योग्य असल्याचे सिद्धही केले. आज चेन्नई संघाची सुरुवात अतिशय खराब झाली,सामन्याच्या पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सने कॉन्व्हे आणि मोईन अलीला बाद करुन चेन्नईच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.

यावेळी चेन्नईच्या नावावर फक्त 2 धावा लागल्या होत्या. त्यातच दुसऱ्या षटकात बुमराहने रॉबिन उथप्पाला 1 धावेवर पायचीत करुन चेन्नईला आणखी एक मोठा धक्का दिला आणि यातून सावरण्याआधीच ऋतूराज गायकवाडलाही केवळ 7 धावावर सॅम्सने बाद करुन चेन्नईची अवस्था 4 बाद 17 अशी केली. अगदी थोडयाच वेळात अंबाती रायडू आणि शिवम दुबेलाही परत पाठवून चेन्नईची अवस्था 6 बाद 39 अशी केली. हा सामना कमी धावसंख्येचा आणि रोमहर्षक होणार याचा अंदाज यायला लागला होता,चेन्नई संघ पुरता संकटात सापडला होता अन याचवेळी महेंद्रसिंग धोनीने आपला दमखम दाखवायला सुरुवात केली.

त्याने आक्रमण करत धावा काढायला सुरूवात केली, त्याला साथ द्यायला दुसऱ्या बाजूने ब्रावो होता. या दोघांनी या कठीण परिस्थितीत छोटी पण 39 धावांची महत्त्वपूर्ण अशी भागीदारी करून डावाला बऱ्यापैकी आकार दिला. ही जोडी जमलीय असे वाटत असताना ब्रावोला कुमार कार्तिकेयने बाद करत ही जोडी फोडली. ब्रावोचा तिलक वर्माने अप्रतिम झेल घेत कार्तिकेयनच्या नावावर ही विकेट केली,त्यानंतर लगेचच त्याने सिमरनजीत सिंगलाही याच षटकात बाद केले, तर तीक्षणाला रमनदीप सिंगने बाद करुन चेन्नईची अवस्था 9 बाद 81 केली.  यानंतर धोनीने एक चौकार आणि एक षटकार मारत चेन्नईला 97 धावाची मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलला.

चौधरीला नॉन स्ट्राईकला ठेवण्याच्या नादात धोनीने एक चोरटी धाव घेण्याचा केलेला प्रयत्न ईशान किशनच्या चपळाईने फसला आणि चेन्नईचा डाव 97 धावांवर समाप्त झाला.चेन्नईसाठी धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या, ज्यामधे 4 चौकार आणि 2 षटकार सामील होते. मुंबई कडून डॅनियल सॅम्सने जबरदस्त गोलंदाजी करताना 16 धावा देत 3 बळी मिळवले, त्याला कार्तिकेयन आणि मेर्डीथने दोन दोन बळी घेत चांगली साथ दिली.

या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाचीही चांगलीच त्रेधातिरपीट उडाली, ईशान किशनने एक सुंदर कव्हर ड्राइव्ह मारत चांगली सुरूवात केली,पण मुंबईच्या डावाच्या पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने एका अप्रतिम आऊटस्विंग वर त्याला चकवले आणि धोनीने तो झेल आरामात टिपून मुंबईला पहिला धक्का दिला. रोहीतनेही चार खणखणीत आणि तितकेच दिलखेचक चौकार मारत वेगवान 18 धावा केल्या,पण सिमरनजित सिंगने त्याला 19वी धाव घेवू दिली नाही, आणि त्याला धोनीच्याच हातून झेलबाद करुन मुंबई संघाला दुसरा मोठा धक्का दिला.

यातून सावरण्याची जराही उसंत न देता मुकेश चौधरीने 5 व्या षटकात सॅम्स आणि स्टब्स्ला बाद करत मुंबईची अवस्था 4 बाद 33 अशी बिकट केली,यावेळी घरच्याच मैदानावर मुंबईला पुन्हा एकदा माती खावी लागणार असेच चिन्हे दिसत होती,मात्र याचवेळी युवा तिलक वर्मा आणि ऋत्विक शोकीन ही नवखी जोडी एकत्र आली आणि त्यांनी अतिशय प्रगल्भ खेळत बघताबघता आलेले सर्व दडपण झुगारून लावत सुंदर खेळ करून संघाला विजयाच्या अगदीच जवळ आणले.

मुळातच असलेले 98 धावांचे माफक आव्हान एका छोट्या भागीदारीनेही आवाक्यात येणारे होते, त्यात या जोडीने 48 धावांची बहुमूल्य भागीदारी करुन विजय जवळपास आणला होताच की मोईन अलीने शौकीनला 18 धावावर त्रिफळाबाद करुन ही जोडी फोडली आणि पुन्हा सामन्यात रंगत निर्माण केली. यावेळी मुंबई संघाला विजयासाठी अजूनही 17 धावा हव्या होत्या. ज्या मानल्या तर क्षुल्लक मानल्या तर कठीण होत्या मात्र टीम डेविडने दोन फटक्यात विजयी लक्ष गाठले . त्यात तिलक वर्माच्या नाबाद 34 धावांचाही मोठा वाटा आहे ज्यामुळे मुंबई संघाला आपल्या तिसऱ्या विजयासह थोडाफार आत्मसन्मानही मिळवून दिला.

अर्थात मुंबई साठी हा विजय म्हणजे वरातीमागून घोडे असाच आहे,पण किमान अंत भला तो सब भला नुसार मुंबईला हा विजय जखमेवरची हळूवार फुंकर ठरेल, नाही का? चेन्नईच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या डॅनियल सॅम्सला यावेळी सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • चेन्नई सुपर किंग्ज – 16 षटकात सर्व गडी बाद 97, गायकवाड 7,रायडू 10,दुबे 10, ब्रावो 12, धोनी नाबाद 36, सॅम्स 16/3, मेर्डीथ 27/2,कार्तिकेय 22/2 पराभूत विरुद्ध
  • मुंबई इंडियन्स – 14.5 षटकात 5 बाद 103, रोहीत 18,ईशान 6,शौकीन 18,तिलक वर्मा नाबाद 34,टीम डेविड नाबाद 16 मुकेश चौधरी 23/3,सिमरनजीत सिंग 22/1,मोईन अली 17/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.