Corona Free Pune: मायक्रोसॉफ्ट होप फाऊंडेशनचा पुढाकार, रुग्णांच्या दारापर्यंत जाऊन तपासणी करणार

Microsoft Hope Foundation extends support of 1 4cr INR for PMC CORONA FREE PUNE initiative

एमपीसी न्यूजः पुणे शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाबरोबरच काही सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट होप फाऊंडेशनने ‘कोरोनामुक्त पुणे’साठी महापालिकेला मोलाची मदत केली आहे. शहरात रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही अधिक आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तपासणी करण्यासाठी कोविड-19 टेस्ट बस ही वातानुकुलित बस पुणे महापालिकेच्या मदतीला देणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी टि्वटरद्वारे ही माहिती दिली.

या कोविड-19 टेस्ट बसमध्ये सीटी स्कॅन, एक्स रे, टेलि रेडिओलॉजी आणि स्वॅब टेस्टिंगचीही सुविधा आहे. शहरातील झोपडपट्ट्या आणि कंटेन्मेंट झोनमध्ये या बस नागरिकांच्या दारापर्यंत जातील. ही बस संपूर्णपणे वातानुकुलित आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट होप फाऊंडेशनने 1.4 कोटींचे अर्थसहाय्य केले आहे. याबाबत दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे रुबल अग्रवाल यांनी टि्वटरवर सांगितले असून त्यांनी यासाठी होप फाऊंडेशनचे आभारही मानले आहेत


या बसच्या माध्यमातून 36000 रुग्णांची त्यांच्या घरापर्यंत जाऊन तपासणी करता येणार असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. या बसमध्ये रुग्णांना आरोग्य विषयक माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.