Pimpri : मायेचा ओलावा फक्त महाराष्ट्राच्याच मातीत; पिंपरीतून पश्चिम बंगालला गेलेल्या कामगाराची भावना

Migrant labourers from talwade travel 2200 km on bike to reach native place in kolkatta West Bengal.

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे)-
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

असाच काहीसा अनुभव या महाराष्ट्राने परराज्यात जाणाऱ्या कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या तळवडे परिसरातून पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या गौतम चक्रवर्ती यांनी त्यांना आलेला अनुभव ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना सांगितला आहे.

चार राज्ये ओलांडून जात असताना महाराष्ट्र राज्यात जी आपुलकी, प्रेम आणि सहकार्य मिळाले, तसे सहकार्य मार्गावरील इतर कोणत्याही राज्यात मिळाले नाही. मायेचा ओलावा फक्त महाराष्ट्राच्याच मातीत असल्याची भावना चक्रवर्ती यांनी व्यक्त केली.

गौतम चक्रवर्ती 2000 सालापासून पिंपरी चिंचवड शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते महाराष्ट्रात राहतात, काम करतात. तळवडे येथे एका कंपनीत ते मेकॅनिकल विभागात काम करतात.

कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला हादरवले. त्यातून कामगार कसा सुटेल. कामगारांचीही धावपळ झाली. लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक नगरीतल्या यंत्रांचा खडखडाट बंद झाला आणि कामगारांच्या खिशाला त्याची झळ बसली.

गावाकडे जाण्यासाठी सर्व कामगार धडपडू लागले. सरकारने कामगारांसाठी पास, आरोग्य तपासणी, विशेष रेल्वे, बस यांची सोय केली. त्यामुळे काही कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि नागरिक घरी जाऊ शकले.

त्यातून राहिलेल्या नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने जाणे पसंत केले. काहीजण पायी गेले तर काहीजण दुचाकीवरून. गौतम चक्रवर्ती आणि त्यांचे तीन सहकारी 14 मे 2020 रोजी दुचाकीवरून त्यांच्या पश्चिम बंगाल मधील गावी निघाले.

दरम्यान, सर्वांनी आरोग्य तपासणी केली. प्रशासनाकडून प्रवासासाठी पास घेतला. आवश्यक साहित्य व साधने घेऊन चक्रवर्ती आणि त्यांचे तीन साथीदार पिंपरी चिंचवड मधून निघाले.

महाराष्ट्रात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ असा प्रवास केला. त्यांनतर छत्तीसगड, ओडीसा, झारखंड मार्गे त्यांनी पश्चिम बंगाल गाठले.
चक्रवर्ती म्हणतात, “महाराष्ट्रातून प्रवास करताना दर 10 किलोमीटर अंतरावर जेवण, पाणी यांची सोय होती. ठिकठिकाणी रात्रीचा निवारा सुद्धा होता. त्यातच रस्त्याच्या आजूबाजूला असलेले पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणी योग्य काळजी घेऊन झोपण्याची व्यवस्था व्हायची.

महाराष्ट्रात प्रवास सुरु होता. रात्र झाल्याने आराम करणं आवश्यक होतं. एक पेट्रोल पंप दिसला. आम्ही तिथं गेलो आणि त्यांना रात्रभर पंपाच्या बाहेर झोपू देण्याची विनंती केली.

तर पेट्रोल पंप चालकांनी बाहेर न झोपवता त्यांची एक खोली दिली. त्यात आम्ही एक मुक्काम केला. तिथल्या लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं, असेही चक्रवर्ती म्हणाले.

ठिकठिकाणी जेवण, पाणी मिळत असल्याने महाराष्ट्रातला प्रवास अतिशय व्यवस्थित झाला. या प्रवासात कुठेही अडचण आली नाही. त्यानंतर छत्तीसगड राज्यात आम्ही प्रवेश केला.

प्रवास करणाऱ्या चौघांमध्ये मीच सिनिअर असल्याने सगळी जबाबदारी माझ्यावर होती. छत्तीसगडमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखा सुखद अनुभव आला. जवळपास दिवसभर आम्ही गाडी चालवत होतो. कुठेही जेवणाची सोय नव्हती. भुकेने जीव व्याकुळला होता.

अशा वेळी आम्ही एका पोलीस चेकपोस्टवर पोहोचलो. त्यातल्या एका पोलीस काकांनी आम्हाला भूक लागल्याचे हेरले. ते पोलीस बाजूला आले. त्यांनी आम्हला एका हॉटेल समोर नेलं. हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आणि जेवणाचे पार्सल घेतले.

हॉटेलपासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली बसवून आम्हाला त्या पोलीस काकांनी जेवू घातले. असे बोलताना चक्रवर्ती भावूक झाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “छत्तीसगड राज्यातील प्रवास एका दिवसात संपला. त्यानंतर आम्ही ओडीसा राज्यात प्रवेश केला. झार्सूगुडा शहरात गेल्यानंतर रात्र झाली. रस्त्यावर झोपणे सुरक्षित नसल्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपण्याचा निर्णय घेतला.

स्टेशनवर गेलो असता तिथल्या नागरिकांनी आम्हाला थेट हाकलून दिले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बाहेर काढले. रस्त्यावर कुठेही झोपा काहीही करा पण इथे थांबू नका, असा सल्ला आम्हाला देण्यात आला.

तिथून पुढे खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि आराम करायला निवारा नाही अशी अवस्था झाली. दोन हजार 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सहा दिवसानंतर 19 मे रोजी घरी पोहोचलो. पण महाराष्ट्रात झालेल्या आदरातिथ्याची आठवण रस्त्यात वारंवार येत होती.

संपूर्ण प्रवास करून घरी पोहोचेपर्यंत पिंपरी चिंचवड मधील मित्रांचे सारखे फोन येत होते. काळजी घेण्यास सांगत होते. आम्हाला अडचण आली की ते फोनवरून हळहळ व्यक्त करीत होते, असे चक्रवर्ती यांनी भावनिक होऊन सांगत महाराष्ट्राचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.