Pune : शिवाजीनगर बसस्थानकाच्या स्थलांतराला लागणार जास्त कालावधी 

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवर महामेट्रोकडून मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील बसस्थानक मुळा रोड येथील कृषी महाविद्यालयाच्या साडेतीन हेक्‍टर जागेवर स्थलांतरित करण्यास एस. टी महामंडळाने परवानगी दिली असली, तरी त्यासाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागेच्या हस्तांतरणासंदर्भात कृषी महाविद्यालयाने अजून प्रतिसाद दिला नसल्याची माहिती महामेट्रोच्या रेंजहिल ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक राजेश जैन यांनी दिली. त्यामुळे जानेवारी-2019 मध्ये हे स्थानक स्थलांतरित करण्याचे पूर्वीचे नियोजन तीन ते चार महिने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असेल. त्यात शिवाजीनगर हे पहिले भुयारी स्थानक आहे. मात्र, येथे एस. टी., पीएमपी तसेच रेल्वेचेही स्थानक असल्याने या ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागेवर महामेट्रोकडून मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारला जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोकडून महापालिकेच्या मदतीने स्थानकाच्या आसपासची अतिक्रमणे काढून घेऊन सर्व जागेला बॅरिगेटस्‌ केले आहे. तसेच याठिकाणी असलेल्या सेवा वाहिन्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक इतरत्र “शिफ्ट’ करणे आवश्‍यक होते. त्यासाठी महामेट्रोने जुना पुणे-मुंबई रस्त्यावरील मुळा रोडच्या बाजूला असलेली जागा तसेच आरे डेअरी बाजूच्या जागांचा पर्याय दिला होता. मात्र, मुळा रोडची जागा रस्त्याच्या बाजूला असल्याने एसटी महामंडळाने त्यास प्राधान्य देत शिवाजीनगर स्थानक मल्टिमॉडेल हबचे काम पूर्ण होईपर्यंत मुळा रोड येथे स्थलांतरित करण्यास होकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.