Pune : बोरघाटामध्ये दुधाचा टँकर उलटला, चालकाचा जागीच मुत्यू

महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात अमृतांजन पुलाच्या पुढील वळणावर दुधाचा टँकर उलटल्याने अपघात झाला.  हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने हा दुधाचा टॅकर भरधाव वेगात जात असताना खंडाळा घाटातील तीव्र उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील टॅकर पुलाच्या खांबाला धडकला व पलटी झाला. ही धडक ऐवढी भयंकर होती की यामध्ये टॅकरच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालक जागीच ठार झाला. टॅकर पलटी झाल्याने गाडीमधील दुध देखील वाहून गेले. या अपघातामुळे काही काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक विस्कळीत झाली होती. घाट परिसरातील तिव्र उतार व वळणावर चालकांनी वाहनांचा वेग कमी करणे गरजेचे असताना याकडे दुलर्क्ष केल्याने असे अपघात घाटात घडत अाहेत.

 अडीच तास वाहतुक विस्कळीत

 मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आठ वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक तब्बल अडीच तास विस्कळीत झाली होती.  वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर टँकर बाजुला करत वाहतुक सुरळीत करण्याचे काम सुरु असताना अचानक या भागात या तीन कार, एक पिकअप, एक कंटेनर व ति ट्रेलर ही आठ वाहने एकमेकावर आदळल्याने हा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद झाल्याने तब्बल अडीच तास वाहतुक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाजुला केल्यानंतर साडेपाचच्या सुमारास वाहतुक पुर्वपदावर आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.