Maval : मावळात जोरदार शक्तीप्रदर्शन करत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; रवींद्र भेगडे यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज – कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आज मावळात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने सलग तिसर्‍यांदा मावळात बाळा भेगडे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी बैलगाडीमधून मिरवणूक काढत मावळवासीयांचे आशीर्वाद घेतले. 

मागील काही दिवसांपासून मावळ भाजपात उमेदवारीसाठी जोरात रस्सीखेच सुरु होती. मात्र, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यात राज्यमंत्री बाळा भेगडे यांना यश आले आहे. रवींद्र भेगडे यांनी भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने पक्ष विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली आहे.

भाजपचा अभेद बालेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्यात भाजपाच्या 14 जणांनी उमेदवारीकरिता मुलाखती दिल्या होत्या. यापैकी राज्यमंत्री बाळा भेगडे, तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके व युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे या तीन इच्छुकांनी मावळात मागील महिनाभर जोरदार शक्ती प्रदर्शन करत गावभेट दौरे आखले होते. तिघांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी उमेदवारीवर दावा केला होता. यामध्ये विकासकामाचा डोलारा रचणारे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनाच उमेदवारी देत पक्षाने विकासाला महत्व दिले आहे.

आज वडगाव मावळ येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या निनादात बाळा भेगडे यांनी लक्षवेधी रॅली काढली होती. लोणावळा ते देहुरोड व ग्रामीण मावळातील हजारो समर्थकांच्या साक्षीने त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळा भेगडे म्हणाले मागील गत पाच वर्षात मावळात 1300 कोटी रुपयांचा विकासनिधी आणत मावळ तालुक्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात मावळ तालुक्याला विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अग्रगण्य तालुका करण्याचा माझा मानस आहे. मावळ तालुका हे माझे कुटुंब आहे या कुटुंबाची साथ व पक्षाचा विश्वास या बळावर किमान 50 हजाराहून अधिक मताधिक्याने मावळात विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या रुपाने मावळात हॅट्रिकचा इतिहास रचला जाणार आहे. मात्र, त्यांना सुनील शेळके यांनी आव्हान देत राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली आहे. मावळातील सर्व गट तट एकत्र करून लढण्याचे शिवधनुष्य शेळके यांना पेलावे लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाने पक्षातील निष्ठावानांना डावलत आयारामांना उमेदवारी दिल्याने पक्षातील काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे तर काही नेते मंडळींनी शेळके यांचे पक्षात जोरदार स्वागत केले आहे. भेगडे यांच्या तोडीस तोड शक्तीप्रदर्शन करत शेळके शुक्रवारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मावळ तालुका राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत गटबाजीने मावळात सलग वीस वर्ष राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना देखील पराभवाचा सामना करावा लागल्याने मावळात राष्ट्रवादीने हातपाय गाळले होते. मावळात पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी शेळके यांना उमेदवारी देऊ केली आहे. शेळके यांच्या या निर्णयाने त्यांच्या इतर पक्षातील सहकार्यांची चलबिचल झाली असून अनेक जण आज गळ्यात भाजपच्या पट्टया घालत बाळा भेगडे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते.

बाळा भेगडे यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सुनील शेळके यांचे नाव न घेता त्यांना कर्णाची उपमा दिली. महाभारतातील कर्ण हा दानशूर होता, पांडवाच्या सोबत होता तोपर्यंत यशस्वी होता पण कौरवांमध्ये सामील झाल्यानंतर त्याचे काय झाले तसेच मावळच्या कर्णाचे होणार असल्याने मावळात महाभारताची पुनरावृत्ती होणार, असे सांगितले. बाळा भेगडे यांनी मावळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेत मावळ तालुक्यातील आम जनतेच्या आशीर्वादाने किमान 50 हजार मतांनी विजयी होऊ, असा आशावाद अर्ज दाखल करताच व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.