Ministry Of Road Transport And Highways on Helmet : हेल्मेट घेताय…? मग हे वाचा…

हेल्मेट बनविण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून नवीन मापदंड; 1 मार्च पासून BIS मार्क असलेलेच हेल्मेट चालणार

एमपीसी न्यूज – आपण घेत असलेले हेल्मेट सुरक्षित आहे का? तसेच जे हेल्मेट आपण घेतले आहे, ते हेल्मेट वापरण्यासाठी शासनाची परवानगी आहे का? याचा विचार करून हेल्मेट खरेदी करा. कारण 1 मार्च 2021 पासून लोकल हेल्मेट घालणा-या वाहनचालकांना दंड आकारण्यात येणार आहे. त्यावेळी हेल्मेट असूनही का कारवाई केली, असा प्रश्न तुम्ही पोलिसांना विचारू शकणार नाहीत. कारण केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 मार्च 2021 पासून BIS मार्क असलेले हेल्मेटच अनिवार्य केले आहेत.

रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अपघातातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हेल्मेटच्या बाबतीत नवीन निर्णय घेतला आहे. दुचाकी वाहन चालक सर्रास रस्त्याच्या बाजूला लावलेल्या टप-यांवरून हेल्मेट खरेदी करतात. हे हेल्मेट अनेकदा सुरक्षेचे कोणतेही मापदंड न वापरता बनविले जाते. त्यामुळे असे हेल्मेट सुरक्षित नसते.  त्यामुळे आता असे हेल्मेट वापरल्यास दुचाकी चालकाला दंड होणार आहे.

मंत्रालयाने काढलेल्या नवीन नियमावलीनुसार हेल्मेट बनविण्यासाठी संबंधित कंपन्यांना माहिती देण्यात आली आहे. यापुढे कंपनीत निर्माण केल्या जाणा-या प्रत्येक हेल्मेटवर BIS चे मानक चिन्ह छापले जाणार आहे. हेल्मेट तयार करताना बीआयएस अधिनियमांचे पालन कंपन्यांकडून केले जाईल यावर शासन नजर ठेवणार आहे.

विदेशात निर्यात केल्या जाणा-या हेल्मेटवर BIS मार्क छापणे बंधनकारक नाही. कारण विदेशातील मागणीनुसार हेल्मेट बनविले जातात. त्यामुळे विदेशातील मागणी ज्याप्रमाणे असेल, त्याप्रमाणे हेल्मेट बनवले जातील. भारतात वापरण्यात येणा-या हेल्मेट बाबत केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आहे.

लोकल हेल्मेट बनविणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आर्थिक दंडासह कारागृहाचीही तरतूद बीआयएस अधिनियमात करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही परिवहन मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे.

BIS मार्क असलेलेच हेल्मेट का?

BIS मार्क असलेलेच हेल्मेट का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर असे आहे की, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हेल्मेट उत्पादन करणा-या कंपन्यांना हेल्मेटच्या क्वालिटी बाबतचे मानक घालून दिले आहेत. त्या मानकांच्या नुसारच हेल्मेटचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे अपघात घडल्यास डोक्यावर BIS मार्क असलेले हेल्मेट असेल तर डोक्याला कमी क्षति होईल, असा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

मग आम्ही काय करायचं?

आतापर्यंत ज्यांनी साधे हेल्मेट खरेदी केले आहेत. त्यांना आपले हेल्मेट 1 मार्च 2021 पासून त्यांचे साधे हेल्मेट घरी ठेऊन द्यावे लागणार आहेत. तसेच BIS मार्क असलेले हेल्मेट खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. बरं खरेदी केलेले हेल्मेट सर्व मापदंड पाळूनच बनविले आहे, याची खात्री काय. कारण अनेकजण बनावट शिक्का बनवून सुद्धा त्यांचे हेल्मेट खपवू शकतात. असे हेल्मेट खरेदी केल्याने नागरिकांना फसवणुकीचा त्रास आणि बनावट हेल्मेट घातल्याने पोलिसांच्या कारवाईचा त्रास, अशी दुहेरी डोकेदुखी होऊ शकते. याबाबत मंत्रालयाने सविस्तर नियमावली सादर करावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.